वडेट्टीवार प्रसन्न! बारमालकाने विजय वडेट्टीवारांचा फोटो लावून केली आरती

दारूबंदी उठवल्याच्या आनंदात चक्क वडेट्टीवारांच्या फोटोची पूजा, आरतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल  

Updated: Jul 9, 2021, 09:03 PM IST
वडेट्टीवार प्रसन्न! बारमालकाने विजय वडेट्टीवारांचा फोटो लावून केली आरती title=

चंद्रपूर : पूर्व विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी चर्चेचा विषय ठरली होती. या जिल्ह्यात लागू करण्यात आलेली दारुबंदी उठवण्यात यावी अशी मागणी केली जात होती. अखेर जिल्ह्यातील दारुबंदी सहा वर्षानंतर उठविण्यात आली. याबाबत राज्य सरकारने शासन निर्णय काढून अधिकृत शिक्कामोर्तब केलं. 

दारुबंदी उठवल्यानंतर जिल्ह्यातील बंद झालेली दारुची दुकानं, बार आणि रेस्टॉ़रंट सुरु झाले असून एका बार मालकाने चक्क पालकमंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांचा फोटो लावून आरती केली. चंद्रपूर शहराच्या वेशीवर असलेल्या ग्रीन पार्क बार रेस्टॉरंटमध्ये पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांची तसबीर लावली. बार उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी आनंदात असलेल्या बार मालकाने विजय वडेट्टीवार यांच्या फोटोसमोर आरती केली. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 

दारुंबदीमुळे गेली 6 वर्ष अत्यंत तोट्यात केल्याची भावना व्यक्त करत या बार मालकाने वडेट्टीवर यांनी दारुबंदी उठवून अनंत उपकार केल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. 

चंद्रपुरात होती 2015 पासून दारूबंदी!

2015 पासून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दारूबंदी लागू होती. दारूबंदी उठवण्यात यावी, अशी मागणी करणारी तब्बल अडीच लाख निवेदने सरकार दरबारी पाठवण्यात आली. तर दारूबंदी कायम ठेवावी, यासाठी 30 हजार निवेदनं आल्याचं सरकारी आकडेवारी सांगते. दारूबंदी लागू केल्यानंतर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अवैध दारू सेवन आणि त्याची विक्री वाढली होती. तरुण वर्ग त्याच्या आहारी जाऊ लागला होता, तर महिला-लहान मुले या व्यवसायात उतरले होते. परिणामी जिल्ह्यामध्ये गुन्हेगारीमध्ये वाढ होऊ लागली होती, या कारणामुळेच दारुबंदी उठवण्याच निर्णय घेण्यात आल्याचं चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं होतं.