राज्यातील 'या' जिल्ह्यात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव, पशुसंवर्धन मंत्र्यांनी केलंय 'हे' आवाहन

 प्रसारीत होणाऱ्या अफवांपासून सावध राहा असं आवाहन 

Updated: Jan 17, 2021, 12:47 PM IST
राज्यातील 'या' जिल्ह्यात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव, पशुसंवर्धन मंत्र्यांनी केलंय 'हे' आवाहन

मुंबई : राज्यात बर्ड फ्लू नियंत्रणात असून भीती नको , काळजी घ्या, या विषाणूचा प्रसार कुक्कुट पक्ष्यांचे मांस, अंडी किंवा मासे यांच्यामार्फत होत नाही. मांस, अंडी आणि मासे खाऊ शकता अशी माहिती पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी दिली. समाजमाध्यमे आणि इतर प्रसिद्धी माध्यमातून प्रसारीत होणाऱ्या अफवांपासून सावध राहा असं आवाहन त्यांनी केलं. 

मुळशी तालुक्यातील नांदे इथे जिल्ह्यातील पहिला बर्ड फ्ल्यूचा विषाणू सापडला असून  परिसरात खळबळ उडाली आहे. मावळ आणि मुळशीतील सर्व टीमच्या सहाय्याने  संध्याकाळ पर्यन्त तेथील   पोल्ट्रीतील सुमारे पाच  हजारावरून अधिक कोंबड्यांची विल्हेवाट लावण्यात आली आहे, अशी माहिती तालुका पशूसंवर्धन अधिकारी डॉ.सचिन काळे यांनी दिली.

लातूर जिल्ह्यातल्या आणखी दोन गावांमध्ये बर्ड फ्लूच्या केस समोर आल्या आहेत. उदगीर तालुक्यातील वंजार वाडी आणि औसा तालुक्यातील खुर्दवाडी इथल्या कोंबड्यांचे बर्ड फ्लू अहवाल पॉझिटीव्ह आलेत

पंढरपूरातल्या मंगळवेढा तालुक्यातील जंगलगी गावात कोंबड्यांचा मृत्यू  बर्ड फ्लूमुळे झाल्याचं स्पष्ट झालंय. जंगलगी परिसरापासून एक किलोमीटर अंतरावरच्या सर्व कोंबड्या नष्ट करण्यात येणार आहेत. शीघ्र कृती दलाच्या माध्यमातून कोंबड्यांची शास्त्रोक्तपद्धतीने विल्हेवाट लावण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिलेत. 

परभणी जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूचं संकट दिवसेंदिवस वाढतच चाललय, परभणी तालुक्यातील पेडगाव हासनापुर परिसरातील शेतात कुक्कुट पालन व्यावसायिक राजेंद्र सखाराम काळंके यांच्या शेकडो कोंबड्यांचा मृत्यू हा बर्ड फ्ल्यूनेचा झाल्याचं स्पष्ट झालंय, परभणी जिल्ह्यात मुरुंबा,कुपटा आणि आता पेडगाव इथल्या कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्ल्यूने झाल्याने कुक्कुट पालन करणाऱ्या व्यावसायिकांची चिंता वाढतेय. पेडगाव इथल्या जिवंत पक्ष्यांना दयामरण देण्याची प्रक्रिया सुरू झालीये.

अंबाजोगाई तालुक्यात ‘बर्ड फ्ल्यू’चा शिरकाव..लोखंडी सावरगाव इथल्या कुक्कुटपालन केंद्रातील कोंबड्यांचा मृत्यू ‘बर्ड फ्ल्यू’ मुळेच झाल्याचे स्पष्ट झालंय...त्यामुळे या परिसरातील एक किमीवरच्या पक्षांचं कलींग करून नष्ट करण्याचे  असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत.

नांदेड जिल्ह्यात बर्ड फ्लू चा शिरकाव झालाय. दोन गावांत बर्ड फ्लूची लागण झाल्याचा अहवाल भोपाळ इथल्या प्रयोग शाळेने दिलाय... कंधार तालुक्यातील नावंद्याचीवाडी आणि माहूर तालुक्यातील पापलवाडी इथल्या मृत कोंबड्याना बर्ड फ्लूची लागण झाल्याचा अहवाल आलाय. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील या दोन्ही गावांना जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार 'संसर्गग्रस्त क्षेत्र' म्हणून घोषित करण्यात आलंय.. बर्ड फ्लूची  लागण झाल्यामुळे दोन्ही गावातील कुक्कुटपालन करणारे शेतकरी मोठ्या संकटात सापडलेत.