सागर आव्हाड, झी मीडिया, नाशिक : नाशिकमध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. प्रसव वेदना सुरु झाल्याने एक महिला हॉस्पीटलमध्ये जाखल झाली. आईनेच मुलीची प्रसुती केल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या आरोग्य केंद्रात घडली आहे. या घटनेमुळे आरोग्य व्यवस्थेचा अनागोंदी कारभार चव्ह्याट्यावर आला आहे.
त्र्यंबकेश्वर तालुक्यात बरड्याचीवाडी गावात राहणारी यशोदा आव्हाटे ही महिला प्रसूतीसाठी अंजनेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात सकाळी दाखल झाली. मात्र, आरोग्य केंद्रात एकही आरोग्य अधिकारी किंवा कर्मचारी हजर नसल्याने आईलाच मुलीची डिलिव्हरी करावी लागल्याचा आरोप करण्यात येत आहे.
आई आणि आशा वर्कर सोबत यशोदा अंजनेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाली होती. आईच्या मदतीने प्रसूती होताच यशोदा यांनी एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. जागतिक महिला दिन दोन दिवसांवर आलेला असतांनाच हा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. अंजनेरी प्राथमिक आरोग्य केंद्रातल्या या संतापजनक प्रकारानंतर कारवाईची मागणी केली जात आहे.
अहमदनगरमध्येही अशीच धक्कादायक घटना घडली होती. अहमदनगर जिल्ह्यात देवळाली प्रवरामध्ये कमल शिंदे ही महिला प्रसूतीसाठी ग्रामीण रूग्णालयात गेली होती. मात्र तिथे तिला दाखल करून घ्यायला प्रशासनानं नकार दिला. महिलेच्या नातेवाईकांनी अनेक विनवण्या केल्या. पण ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी महिलेला दाखल करुन घेण्यास नकार दिला. अखेर नाईलाजास्तव या नातेवाईकांनी महिलेला खासगी रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला. मात्र खासगी रुग्णालयात नेत असताना मध्येच रस्त्यात महिलेला प्रसूती वेदना सुरु झाल्या. स्थानिक महिलांनी रस्त्यावरच कमल शिंदेची प्रसूती केली.
ठाण्याच्या कळव्यामधल्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. योगेश शर्मा आणि उप अधिष्ठाता डॉ. सुचितकुमार कामखेडकर यांना निलंबित करण्यात आलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या रुग्णालयात आज विशेष प्रसूतीगृहाचं उदघाटन केलं त्यानंतर त्यांनी अचानक या हॉस्पिटलचा दौरा केला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांसमोर रुग्ण आणि नातेवाईकांनी तक्रारीचा अक्षरशः पाढा वाचला. तसंच मुख्यमंत्र्यांनाही अनेक ठिकाणी गैरसोय आढळून आली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी अधिष्ठाता आणि उप अधिष्ठात्यांच्या निलंबनाचे तात्काळ आदेश दिले. कळवा रुग्णालयातल्या असुविधा आणि अनास्थेसाठी शर्मा आणि कामखेडकर यांना जबाबदार धरण्यात आले.