नाशिक : देशात कोरोना रूग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. ओमायक्रॉनचा (Omicron) धोका वाढत आहे. या पार्श्वभूमीवर 3 जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटातल्या मुलांचं लसीकरण सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे.
मुलांच्या लसीकरणासाठी कोव्हॅक्सिन (covaxin) ही लस वापरण्यात येणार असून, राज्यातील 66500 केंद्रांवर सुमारे साठ लाख मुलांचं लसीकरण करण्यात येणार आहे. मुलांच्या लसीकरणासाठी कोविन संकेतस्थळावर नावनोंदणी शनिवारपासून (१ जानेवारी) सुरू करण्यात आली आहे. तसंच प्रत्यक्ष लसीकरण केंद्रावर नाव नोंदणीची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
दरम्यान, 15 ते 18 वयोगटातील मुलांसाठी कोव्हॅक्सिन लसीला मंजूरी दिली असताना नाशिकमधल्या येवल्यात (Nashik Yeola) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येवल्यातल्या पाटोदा आरोग्य केंद्रात (Patoda Health Center) एका विद्यार्थ्यांला लहान मुलांसाठी मंजूर करण्यात आलेल्या कोव्हॅक्सिन लसी ऐवजी कोव्हिशिल्डचा डोस (covishield vaccine) देण्यात आला.
धक्कादायक म्हणजे कोव्हिशिल्ड लस घेतल्याने काही होत नाही, मेडिकल मधून गोळ्या-औषधं मुलाला द्या, असा सल्ला लस देणाऱ्या कर्मचाऱ्याने दिल्याचा आरोप विदयार्थ्याच्या वडिलांनी केला आहे. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश तालुका आरोग्य अधिकारी हर्षल नेहते यांनी दिले आहेत.
या प्रकारामुळे पहिल्याच दिवशी आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार मात्र उघड झाला आहे.
दरम्यान आजपासून १५-१८ वर्ष वयोगटातील मुलांसाठी लसीकरण सुरु झालेली आहे. यासाठी कोविन-अॅपवर नोंदणी करता येणार आहे.
कशी करायची नोंदणी?
- सर्व प्रथम Covin App वर जाऊन लॉग इन करा
- मुलाचं नाव, जेंडर आणि जन्मतारीख निवडा
- तुमच्या जवळच्या लसीकरण केंद्राचा पिन कोड टाका. लसीकरण केंद्रांची यादी येईल.
- आता लसीकरणाची तारीख, वेळ आणि लस निवडा
- लसीकरण केंद्रावर जाऊन संदर्भ आयडी, सीक्रेट कोड सांगा आणि लस घ्या
महत्वाचं म्हणजे ज्या मुलांकडे आधार कार्ड किंवा इतर ओळखपत्र नसेल तर त्यांचं दहावीचं ओळखपत्रही पुरावा म्हणून ग्राह्य धरलं जाणार आहे. इतकच नाही तर ऑनलाईन नोंदणीशिवाय वॉक इन नोंदणीचा पर्यायही देण्यात आला आहे. तर मग वाट कसली पाहता? कोरोविरोधातल्या लढाईचा भाग म्हणून प्रत्येक किशोरवयीन मुलानं लस घ्यायलाच हवी.