मालेगाव : मालेगावमध्ये ( Malegaon ) सर्वधर्मीयांच्या ५९९ धार्मिकस्थळांवरील भाेंगे ( Bhonge ) विनापरवानगी असल्याची माहिती समाेर आली. पोलिसांनी भाेंग्यांसाठी परवानगीची सक्ती करत आजपासून धार्मिकस्थळांच्या भाेंग्याची डेसिबल मर्यादा तपासणी करण्याचा निर्णय घेतलाय.
सर्वोच्च न्यायालयानुसार रात्री १० ते सकाळी ६ दरम्यान ध्वनिक्षेपक बंद राहतील. न्यायालयाचे आदेश व नियम धुडकावणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांनी दिला.
भाेंग्याच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी खांडवी यांनी कूल जमाती तंजिमच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीत सर्वोच्च न्यायालयाने सार्वजनिक ठिकाणी ध्वनिक्षेपकांची मर्यादा निश्चित केल्याचे स्पष्ट केले. तसेच, न्यायालयीन आदेश व कायद्याचे पालन करण्याचे मुस्लिम धर्मगुरूंनी आश्वासन दिले.
भाेंग्यांच्या मुद्यावर सर्वच राजकीय पक्षांची भूमिका जाणून निर्णय घेणार असल्याचे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आमची भूमिका सरकारपुढे ठेवणार आहाेत. सरकार काय धाेरण घेते हे बघून चर्चेअंती निर्णय घाेेषित करू, अशी भूमिका आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांनी घेतलीय.