राज्यात पुन्हा मास्क सक्ती? राज्याच्या आरोग्य संचालकांनी दिलं मोठं अपडेट

महाराष्ट्र, हरियाणा, दिल्ली, उत्तरप्रदेश आणि मिझोरम या राज्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Updated: Apr 21, 2022, 10:26 AM IST
राज्यात पुन्हा मास्क सक्ती? राज्याच्या आरोग्य संचालकांनी दिलं मोठं अपडेट title=

मुंबई : देशात पुन्हा कोरोना (Corona) रुग्ण वाढू लागल्याने महाराष्ट्रासह पाच राज्यांना केंद्राने अलर्ट दिला आहे. कोरोना रोखण्यासाठी केंद्रीय आरोग्य सचिवांनी पाच राज्याच्या आरोग्य मंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. महाराष्ट्र, हरियाणा, दिल्ली, उत्तरप्रदेश आणि मिझोरम या राज्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. यानंतर आता पुन्हा मास्कसक्ती होणार का हा प्रश्न समोर आला आहे.

याविषयी राज्याचे आरोग्य संचालक डॉ. प्रदीप आवटे झी 24 तासशी बोलताना म्हणाले, दिल्ली हरियाणा आणि उत्तर प्रदेश या भागांमध्ये कोरोनाची रूग्णसंख्या वाढली आहे. दिल्लीच्या डिझास्टर मॅनेजमेंट अथोरिटीने, दिल्लीसाठी पुन्हा मास्क सक्ती केली आहे. त्या ठिकाणी रूग्णसंख्या वाढत असली तरीही रूग्णालयात दाखल होणाऱ्या रूग्णांची संख्या कमी आहे.

महाराष्ट्राची परिस्थिती पाहिली तर 4 आठवड्यात एकूण रूग्णसंख्या वाढलेली नाही. मात्र मुंबईमध्ये रूग्णसंख्येचा चढता आलेख पहायला मिळतोय. मात्र यामध्ये गंभीर रूग्णांचं प्रमाण जास्त नसल्याचंही दिसून आलंय. असं असलं तरीही या परिस्थितीकडे बारकाईने लक्ष ठेऊन आहोत. मोठ्या कार्यक्रमांमध्ये खबरदारी घेणं गरजेचं असल्याचंही डॉ. आवटे यांनी सांगितलं आहे.

महाराष्ट्रात पुन्हा एकदा निर्बंध लागणार का? मास्क सक्ती होणार का? याबाबत चर्चांना उधाण आलंय. यावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

काय म्हणाले राजेश टोपे?

महाराष्ट्रात तूर्तास नोंद घ्यावी अशी रुग्णसंख्या वाढलेली नाही. महाराष्ट्रात सध्या आढळणारी रुग्णसंख्येची गंभीर नोंद घ्यावी अशी नाही, त्यामुळे पुन्हा निर्बंध लावणं किंवा मास्कसक्तीचा कोणताही विचार नाही असं आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. 

मुख्यमंत्री आणि मंत्रीमंडळाने निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतलेला आहे. आरोग्य विभागातर्फे निरिक्षण केलं जात असून गरजेप्रमाणे पावलं उचलली जात आहेत आणि सध्या तरी वेट अँड वॉचची भूमिका आहे. घाई करण्याची कोणतीही गरज नाही असं आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.