पुणे : मधुसूदन कालेलकर ( Madhusudan kalelkr ) यांच्या रचना असलेले आणि सुमन कल्याणपूर ( Suman kalyanpurkar ) यांनी गायलेलं 'निंबोणीच्या झाडामागे...' हे अंगाई गीत ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे ( Aasha Kale ) यांच्यावर चित्रित करण्यात आलं होतं. 'बाळा गाऊ कशी अंगाई' या चित्रपटही हे गाणं आजही तितक्याच आवडीनं घराघरात ऐकलं जातं.
'निंबोणीच्या झाडामागे...' या एका गाण्यामुळे आशा काळे हे नाव घराघरात पोहोचलं. त्यांच्या या गाण्याची जादू आजही कायम असल्याचं एक उदाहरण नुकतंच समोर आलंय.
कात्रज येथे व्ही. एस. अंकलकोटे पाटील यांना चार महिन्यांचा नातू आहे. तो इतका लबाड की, निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई.. हे अंगाई गीत ऐकल्याशिवाय तो झोपत नाही.
अंकलकोटे कुटुंबीयांशी आशा काळे यांचे अनेक वर्षांपासून सख्य आहे. त्यांनी ही गोष्ट आशा ताईंना सांगितली. त्यांनाही या गोष्टीचे आश्चर्य वाटले. नातवाची भेट घेण्याची त्यांना ओढ लागली.
अक्षय तृतीयेच्या दिवशी अभिनेत्री आशा काळे यांनी व्ही. एस. अंकलकोटे पाटील यांचे कात्रज येथील घर गाठले. नातवाबरोबर काही काळ खेळल्या. त्याचे लाड केले. त्यानंतर बाळाची झोपण्याची वेळ झाली.
अंकलकोटे कुटुंबीयांनी युट्युबवर 'निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई.. हे अंगाई गीत लावले. पण, आशा ताईंनी नातवाला पाहत घेतलं आणि स्वतः अंगाई गीत गाण्यास सुरवात केली.
त्या चार महिन्यांच्या नातवासाठी आशा ताईंनी ४५ वर्षानंतर पुन्हा एकदा ते सुपरहिट गाणे गायले. त्याचे हे गीत ऐकून ते चार महिन्यांचे बाळ चटकन आशा ताईच्या कुशीत झोपी गेले.