शेकडो तरुणांची कोट्यवधी रुपयांना फसवणूक करणा-यांना बेड्या

सैन्यात आसाम रायफलमध्ये भरती करण्याचं आमिष दाखवून उत्तर महाराष्ट्रातल्या शेकडो तरुणांची कोट्यवधी रुपयांना फसवणूक करणा-यांना, जळगावच्या पाचोरा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. 

Amit Ingole Amit Ingole | Updated: Feb 26, 2018, 07:48 PM IST
शेकडो तरुणांची कोट्यवधी रुपयांना फसवणूक करणा-यांना बेड्या title=

जळगाव : सैन्यात आसाम रायफलमध्ये भरती करण्याचं आमिष दाखवून उत्तर महाराष्ट्रातल्या शेकडो तरुणांची कोट्यवधी रुपयांना फसवणूक करणा-यांना, जळगावच्या पाचोरा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. 

तीन आरोपींना अटक

अहमदनगरमधल्या वाळकी भागातल्या शेख हुसनोद्दीन चाँद शेख, त्याची पत्नी रेशमा शेख आणि मुलगा वजीर शेख, अशी अटक केलेल्या या तिघा आरोपींची नावं आहेत. सैन्यात सुभेदार असल्याचं सांगून शेख हुसनोद्दीन चाँद याने काही एजंटना हाताशी धरून बेरोजगार तरुणांना हेरलं. 

करोडो रूपयांना लुबाडलं

त्यांना आसाम रायफलमध्ये भरती करून देण्याचं आमिष दाखवलं. त्यासाठी प्रत्येकाकडे ४ लाखांची मागणी केली. त्यातले एक लाख रुपये त्यानं आगाऊ घेतले. त्यांनतर शेखनं काही उमेदवारांना बनावट नियुक्तीपत्रंही दिली. जळगावसह धुळे, नंदुरबार, नाशिक तसंच नगर जिल्ह्यातल्या शेकडो तरुणांकडून, शेखनं सुमारे ७ कोटी रुपये उकळले असल्याची माहिती पाचोरा पोलिसांनी दिलीय. या प्रकरणी सचिन शिरसाठ या तक्रारदाराने पाचोरा पोलिसांत तक्रार दिल्यानंतर, शेखचं बिंग फुटलं. २०१३ सालापासून शेख याचा काळा धंदा सुरू होता.