विहीरीत पडलेला उंदीर काढण्याच्या प्रयत्नात तिघांचा मृत्यू

तिघेही मजूर एका शेतात सल्फेट मारण्यासाठी गेले होते. 

Updated: Aug 20, 2020, 08:49 AM IST
विहीरीत पडलेला उंदीर काढण्याच्या प्रयत्नात तिघांचा मृत्यू title=

अमर काणे, झी मीडिया, नागपूर: शेतामधील विहीरीत पडलेला उंदीर काढण्याच्या प्रयत्नात तिघांचा मृत्यू झाल्याची घटना नागपुर जिल्ह्यातील वाकेश्वर या गावात घडली आहे.  मौदा तहसीलमधील वाकेश्वरमध्ये काल  दुपारनंतर ही घटना उघडकीस आली. आकाश  पंचबुद्धे , विनोद बर्वे आणि गणेश  काळबांडे अशी मयतांची नावे आहेत.

तिघेही मजूर एका शेतात सल्फेट मारण्यासाठी गेले होते. त्यावेळी शेतातील विहिरीत त्यांना एक उंदीर व बेडूक दिसला. ते काढण्यासाठी एक मजूर हा विहिरीच्या लोखंडी अँगलच्या आधारे विहिरीत उतरला. परंतु, तो बाहेर येत नसल्याने दुसरा तर दोघांना काढण्यासाठी तिसरा मजूर विहिरीत उतरला. मात्र, विहीरीत विषारी वायू असल्यामुळे तिघांचा श्वास गुदमरून मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.  याप्रकरणी अरोली पोलीस तपास करत आहेत.