धक्कादायक... तीन बहीण-भावांचा नदीत बुडून मृत्यू, एकाच चितेवर अंत्यसंस्कार

जाणून घ्या नक्की काय झालं?

Updated: Jul 4, 2021, 10:07 AM IST
धक्कादायक...  तीन बहीण-भावांचा नदीत बुडून मृत्यू, एकाच चितेवर अंत्यसंस्कार  title=

शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर :  जिल्ह्याच्या अहमदपूर तालुक्यातील सुनेगाव शेंद्री येथील एकाच कुटुंबातील तीन चिमुकल्यांचा नदी पात्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मृत पावलेले तिघेही भावंड सुनेगाव येथील जायभाये कुटुंबातील आहेत. 14 वर्षीय रोहिणी जायभाये, 9 वर्षीय प्रतीक जायभाये हे सख्खे बहीण-भाऊ  आणि 12 वर्षीय सख्खा चुलत भाऊ  गणेश जायभाये हे तिघेसोबत मन्याड नदीच्या कडेला शेळ्या चरविण्यासाठी गेले होते.

यावेळी या तिघांना पोहोण्याचा मोह आवरला नाही. त्यामुळे तिघेही नदीपात्रातील एका डोहात पोहण्यासाठी उतरले. मात्र दुर्दैवाने या तिघांनाही पाण्याचा अंदाज आला नाही. परिणामी तीनही चिमुकल्यांचा नदीपात्रातील पाण्यात बुडून मृत्यू झाला. नदीपात्रातील अवैध वाळू उपशामुळे झालेल्या खड्ड्यामुळेच या तीन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याचेही बोलले जात आहे. 

यामुळे जायभाये कुटुंबियांसह संपूर्ण गावावर शोककळा पसरली. रात्री उशिरा या तिघांवरही एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी अहमदपूर तालुक्यातील किनगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.