लॉकडाऊनदरम्यान राज्यातील दंडवसूलीचा आकडा ऐकून थक्क व्हाल

वाचा सविस्तर वृत्त

Updated: Jun 9, 2020, 05:14 PM IST
लॉकडाऊनदरम्यान राज्यातील दंडवसूलीचा आकडा ऐकून थक्क व्हाल  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : Coronavirus कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला. प्रत्येक राज्यात याचे पडसाद दिसून आले. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून महाराष्ट्रातही काही महत्त्वाचे बदल पाहायला मिळाले. 

राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी ४ लाख ६६ हजार ६६९ पास पोलीस विभागामार्फत देण्यात आले. तसेच ५ लाख ९१ हजार ४९६ व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि. २२ मार्च ते ८ जून या कालावधीत कलम १८८ अन्वये १,२४,१०३ गुन्ह्यांची नोंद झाली. तर, २३,९२५ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. विविध गुन्ह्यांसाठी तब्बल ६ कोटी ७८ लाख ८१ हजार १९१ रुपयांचा दंडही  आकारण्यात आला. 

कठोर कारवाई 

कोरोना व्हायरसशी दोन हात करण्यासाठी म्हणून पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. पण, यामध्ये काही दुष्ट प्रवृत्तींच्या वर्गानं त्यांच्यावरही हल्ला केल्याच्या दुर्दैवी घटना घडल्या. पोलिसांवर हल्ला होण्याच्या २६३ घटना घडल्या. त्यात ८४६ व्यक्तींना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.

१०० नंबर-१ लाख फोन

पोलीस विभागाचा १०० नंबर हा सर्व जिल्ह्यात २४ तास कार्यरत असतो. लॉकडाऊनच्या काळात या फोनवर १,००,९५८ फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. राज्यात पोलिसांनी ज्यांच्या हातावर Quarantine असा शिक्का आहे अशा ७२२ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठवल्याची माहितीसुद्धा देशमुख यांनी दिली.

 

कारवाईचा हा बडगा इतक्यायवरच थांबला नाही. तर, लॉकडाऊनच्या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १३३२ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तर ८४,५१७ वाहने जप्त करण्यात आली. तसेच परदेशी नागरिकांकडून झालेले व्हिसा उल्लंघनचे १५ गुन्हे राज्यभरात नोंदवले आहेत. एकंदरच कोरोना व्हायरसशी लढत असताना राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं कामही तितक्याच जबबादारीनं आणि काटेकोरपणे सुरु असल्याचे यातून स्पष्ट होत आहे.