महामार्गावर वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पोलिसांच्या उपाययोजना

महामार्गावर वाहनांच्या रांगा 

Updated: Sep 12, 2018, 05:10 PM IST
महामार्गावर वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पोलिसांच्या उपाययोजना

मुंबई : मुंबई - गोवा महामार्ग आणि मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावर वाहतुकीची कोंडी झाली. अमृतांजन ब्रिजपासून पुढे पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची गर्दी झाल्यामुळे मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर बोरघाटात वाहतूक कोंडी झाली आहे. बोरघाटात ३ ते ४ किलोमीटपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. 

वाहतुक कोंडी दूर करण्यासाठी पोलिसांनी उपाययोजना केल्या आहेत. रायगड जिल्ह्यातून जाणाऱ्या टप्प्यात सर्वाधिक वाहतूक कोंडी पाहायला मिळते. त्यामुळे इथे खारपाडा पूल ते कशेडीदरम्यान ६ उपविभागीय पोलीस अधिकारी, १६ पोलीस निरीक्षक, २४ सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, २९७ पोलीस कर्मचारी असा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

पोलिसांना मदत करण्यासाठी जागोजागी स्वयंसेवकही आहेत. वाहतूक कोंडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही सोय करण्यात आली आहे. अपघात झाल्यास अपघातग्रस्त वाहन तातडीने बाजूला करण्याची सोय करण्यात आली आहे. महामार्गावर अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे.

मुंबई गोवा महामार्गावर अपघात झाला आहे. लोणेऱ्यावर एसटी, टेंपो आणि ट्रक यांच्यात अपघात झाला. अपघातात ७ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. माणगाव उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.