ठाणे-बोरीवली अंतर 20 मिनिटांत पूर्ण होणार; MMRDAच्या बजेटमध्ये ४०००.०० कोटींची तरतूद

Thane-Borivali Twin Tube Tunnel Road: ठाणे-बोरीवली दुहेरी बोगदा प्रकल्पाचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Mar 7, 2024, 06:36 PM IST
ठाणे-बोरीवली अंतर 20 मिनिटांत पूर्ण होणार; MMRDAच्या बजेटमध्ये  ४०००.०० कोटींची तरतूद title=
Twin Tube Tunnel between Thane and Borivali MMRDA budget

Thane-Borivali Twin Tube Tunnel Road: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा सन २०२४-२५ साठीचा सादर करण्यात आला आहे. ४६,९२१.२९ कोटींची तरतूद मुळ अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. मुंबई महानगर प्रदेशातील नागरिकांना अधिकाधिक आणि जागतिक दर्जाच्या सेवा सुविधा उभारण्यासाठी सदर अर्थसंकल्पात सुमारे रू. ४१,९५५.३४ कोटी इतकी तरतूद करण्यात आली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात ठाणे-बोरीवली दुहेरी बोगदा प्रकल्पासाठीही निधी देण्यात आला आहे. त्यामुळंच लवकरच हा प्रकल्प सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री आणि प्राधिकरणाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांनी 2024-25 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात मुंबई व मुंबईलगतच्या परिसरातील पायाभूत सुविधा उभारण्यात येत आहेत. एमएमआरडीएने अनेक प्रकल्पा हाती घेतले आहेत. त्यातीलच एक महत्तावाचा व महत्त्वकांक्षी प्रकल्प म्हणजे ठाणे ते बोरवली (संजय गांधी राष्ट्रीय उद्यान) चार पदरी भुयारी मार्ग. या प्रकल्पासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात  ४०००.०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. 

कसा असेल हा प्रकल्प?

ठाणे ते बोरीवली दरम्यानचा प्रवास वेगवान व्हावा यासाठी हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. एमएमआरडीए ठाणे- बोरीवली दरम्यान दुहेरी बोगदा बांधणार आहे. सध्या ठाण्याहून बोरीवलीला जाण्यासाठी एक ते दीड तासांचा वेळ लागतो. तसंच, कधी कधी वाहतूक कोंडीचा सामनादेखील करावा लागतो. मात्र, या प्रकल्पामुळं हा प्रवास अगदी 10 मिनिटांवर येणार आहे. 

केंद्रीय वन्यजीव मंडळाने परवानगी न दिल्यामुळं कित्येक वर्ष हा प्रकल्प रखडला आहे. मात्र, आता ती परवानगीही मिळाली आहे. त्यामुळं भूमिपूजनाचाही मार्ग मोकळा झाला आहे.  लवकरच या प्रकल्पाचे भूमीपूजन झाल्यावर कामही सुरू होणार आहे. ठाणे-बोरीवली भूमिगत मार्ग 11.8 किमी लांबीचा असून या मार्गात 10.25 किमी लांबीचे दोन बोगदे आहेत. हो दोन्ही बोगदे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणार आहेत. 

ठाणे-बोरीवली दरम्यानचे अंतर या बोगद्यामुळं कमी होणार आहे. बोगद्याच्या दोन्ही बाजूस 2-2 मार्गिकांसह आपत्कालीन मार्ग आहे. प्रत्येकी 300 मीटर पादचारी क्रॉस पॅसेज आणि प्रत्येकी 2 पादचारी क्रॉस पॅसेजनंतर वाहन क्रॉस पॅसेजची तरतूद करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, बोगद्याचे बांधकाम आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे आणि चार टनल बोरिंग मशिनच्या मदतीने होणार आहे.