रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाचा शिरकाव, चार दिवस कार्यालय बंद

रायड जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाचा शिरकाव झाला आहे.  

Updated: Jul 30, 2020, 03:04 PM IST
रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाचा शिरकाव, चार दिवस कार्यालय बंद title=
संग्रहित छाया

अलिबाग : येथील रायड जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून संपूर्ण कार्यालय निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील दोघांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. २९ जुलैला रॅपिड अॅंटीजन तपासणी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्यावतीन करण्यात आली. यावेळी दोन कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे पुढे आले. त्यामुळे आज आणि उद्या आणि शनिवार व रविवारी सुट्टी असल्याने हे कार्यालय चार दिवस बंद राहणार आहे. या कालवधीत जिल्हाधिकारी कार्यालय निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे.

रायगड जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव होत आहे. दरम्यान, व्यापारी संघटना, लोकप्रतिनिधी यांना होणारा तीव्र विरोधानंतर येथील लॉकडाऊन दोन दिवस आधीच समाप्त करण्यात आले होते. नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क आणि सोशल डिस्टंन्सिंग पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, आता जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाचा शिरकाव झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात १०० टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती आहे. तसेच शासकीय कामांसाठी अनेक ग्रामीण भागातून लोक ये-जा करत असतात. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात दोन कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने त्यांच्या संपर्कातील लोकांचा शोध सुरु झाला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय ३ ऑगस्टपासून नियमितपणे सुरु राहिल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. याआधी जिल्हा परिषद, अलिबाग तहसील कार्यालयात कोविड-१९ पॉझिटिव्ह रुग्ण सापडला होता. त्यावेळी ही कार्यालये बंद ठेवण्यात आली होती. आता जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना बाधित सापडल्याने बंद ठेवण्यात आले आहे.