डीजेच्या दणदणाटामुळं दोघांचा मृत्यू? सांगलीत गणेश विसर्जनादरम्यानची दुर्घटना

डीजेच्या दणदणाटाने हृदयाचा झटका येवून दोघा तरुणांचा मृत्यू झाला आहे.  सांगली जिल्ह्यात  गणेश विसर्जन मिरवणुकीत हा प्रकार घडला आहे. 

Updated: Sep 27, 2023, 06:19 PM IST
डीजेच्या दणदणाटामुळं दोघांचा मृत्यू? सांगलीत गणेश विसर्जनादरम्यानची दुर्घटना title=

Sangli News : राज्यात गणेशोत्सवाची धुम सुरु असताना सांगलीत धक्कादायक घटना घडली आहे. डीजेच्या दणदणाटामुळं दोघांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सांगलीत गणेश विसर्जनादरम्यान ही दुर्घटना घडली आहे. या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.  

या दोन्ही तरुणांच्या मृत्येमागे  डीजेचा मोठा आवाज कारणीभूत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.  शेखर पावशे आणि प्रवीण शिरतोडे अशी दोघा मृतांची नावे आहेत. यापैकी एकाची  अँजिओप्लास्टी झाली होती.  डीजेच्या दणदणाटामुळं हार्टबीट वाढून  हृदयविकाराचा झटका आल्याचे मृतांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. 

गणेश विसर्जन म्हटलं की डीजेचा दणदणाट ठरलेलाच. ढोल ताशांची जागा आता कर्कश डीजेनं घेतली आहे. कानठळ्या बसवणारा डीजेचा दणदणाट आणि लेझर लाईट्सचा झगमगाट. त्यात बेहोश होऊन नाचणारी उत्साही मंडळी. मात्र नाचणा-यांचा उत्साह वाढवणारा हा डीजेच आता त्यांच्या जीवावर उठलाय. गणेश विसर्जनादरम्यान डीजेच्या दणदणाटामुळं दोघा तरुणांचा अचानक मृत्यू झाल्याच्या घटना सांगली जिल्ह्यात घडल्यात. 

तासगाव तालुक्यातील कवठेएकंद गावचे शेखर पावशे. वय केवळ ३२ वर्षं. दहा दिवसांपूर्वीच त्यांच्या अँजिओप्लास्टी झाली होती. सोमवारी रात्री विसर्जन मिरवणूक पाहायला शेखर गेला होता. मात्र, डीजेच्या आवाजामुळं त्याला अस्वस्थ वाटू लागलं. तो भोवळ येऊन पडला आणि त्याचा मृत्यू झाला. वाळवा तालुक्यातील दुधारी गावातही अशीच घटना घडली. 35 वर्षांचा प्रवीण शिरतोडेही विसर्जन मिरवणूक पाहायला गेला होता. मिरवणुकीतच त्याला चक्कर आली आणि त्याचा मृत्यू झाला. डीजेच्या दणदणाटामुळं हे मृत्यू झाल्याचं बोललं जातंय. याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. या दोघा मृतांपैकी शेखरची अँजिओप्लास्टी झाली होती. हृदयविकार असणा-या मंडळींनी डीजे वाजत असलेली ठिकाणं किंवा विसर्जन मिरवणुका टाळाव्यात, असा सल्ला डॉक्टरांनी दिलाय.

गणेश विसर्जन म्हणजे आनंदाचा सोहळा. बाप्पाला वाजतगाजत निरोप देण्याची आपली परंपरा. मात्र, बाप्पाला निरोप देता देता जीवघेण्या डीजेमुळं या जगाचाच निरोप घेण्याची वेळ सांगलीतल्या दोघा तरुणांवर आली. यापेक्षा दुसरं दुर्दैव ते काय? विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजवण्याचं फॅड आता गावागावात पसरलंय.. मात्र हा डीजेच आता जीवावर उठलाय. त्यामुळं डीजेवर निर्बंध घालण्याची वेळ आलीय का असा प्रश्न उपस्थित होत आहे.