अहमद शेख, झी मीडिया, सोलापूर : सोलापूर शहरात घरफोडी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली आहे. या चोरांची संपत्ती पाहून पोलिसही थक्क झाले.
कर्नाटक राज्यात चोरी, मारामारी, कॉन्ट्रॅक्ट किलिंग, दरोडा असे विविध गंभीर गुन्हे दाखल असलेले दोन चोर गेले दीड वर्ष सोलापुरात आले आणि इथेच ते राहू लागले. शहरात फिरुन दिवसभर रेकी करायची आणि रात्री चोरी करायची अशी त्यांची मोडस ऑपरेंडी होती. शहरात दहा ठिकाणी त्यांनी चोरी केली होती.
पण पोलिसांच्या तावडीतून ते सुटु शकले नाहीत. पोलिसांनी त्यांच्या नजर ठेवत अखेर त्यांना अटक केली. उमेश खेत्री आणि सुरेश सासवे अशी अटक करण्यात आलेल्या या दोन अट्टल चोरांची नावं आहेत. आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी शहरातील विविध पोलीस ठाणे हद्दीत दहा गुन्हे केल्याची कबूली दिली
चोरांची संपत्ती थक्क करणारी
पोलिसांनी उमेश आणि सुरेश यांच्याकडून 9 लाख 1 हजार 980 रुपये रोख आणि 137 ग्राम सोन्याचे दागिने असे एकूण 25 लाख 93 हजार 357 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पण त्यांच्या चौकशीत पोलिसांना जी माहिती मिळाली ती हैराण करणारी होती. उमेश खेत्री याने चोरीच्या पैशातून आपल्या नातेवाईकांच्या नावाने चुंगी इथं तीन एकर आणि संजवाड इथं दोन एकर अशी पाच एकर शेतजमीन घेतली आहे.
शिवाय मुळेगाव इथं तीन प्लॉट त्याच्या नावावर आहेत. तसंच दोन दुचाकी आणि दोन कारही त्याच्याकडे आहेत. 44 लाख 2 हजार रुपये किमतीचे जमीन, रोकड,दागिन्यांसह 25 लाख 93 हजार 357 रुपये किमतीचा ऐवज हस्तगत केला आहे.
एक आरोपी दिवसभर शहरात बंद घरांची रेकी करत असते त्यानंतर उमेश खेत्री रात्री जाऊन चोरी करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.