हिंमत असेल तर एकही पोलीस सोबत न घेता या असं जाहीर आव्हान उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना दिलं आहे. मुंबईत ठाकरे गटाने महापत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. यादरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर दिलेल्या निकालातील त्रुटी दाखवत आहेत. राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी शिवसेना असल्याचा निकाल देत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला होता.
"अभिनव अशा जनता न्यायालयाची सुरुवात होत आहे. आजचा दिवस इतिहासात नोंद केला जाईल. शिवसेनेबाबतच्या निकालानंतर महाराष्ट्रात संतापाचं वातावरण झालं आहे. गेल्या आठवड्यात लबाडाने नव्हे तर लवादाने जो निकाल दिला त्याच्याविरोधात आपण सुप्रीम कोर्टात गेलो आहोत. सुप्रीम कोर्टाकडून आशा आहे. पण आम्ही आज जनतेच्या न्यायालयात आलो आहोत. कारण देशात मतदार सरकार ठरवत असतो. म्हणजे सरकार कोणाचंही असलं तरी सत्ता जनतेचीच असते," असं उद्धव ठाकरे म्हणाले.
"आता तरी न्याय मिळाला पाहिजे. माझं तर आव्हान आहे की राहुल नार्वेकर, मिंधे यांनी एकही पोलीस सोबत न आणता माझ्यासह जनतेत येऊन उभं राहावं. मीदेखील एकही पोलीस सोबत घेणार नाही. तिथे नार्वेकरांनी शिवसेना कोणाची आहे ते सांगावं. त्यानंतर जनतेने कोणाला पुरावा, गाढावा किंवा तुडवावा हे ठरवावं," असा संताप उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आहे.
"शिवसेना काही विकाऊ वस्तू नाही. जिथे जातो तिथे लाखो शिवसैनिक माझ्यासोबत कसे?आपण सर्वोच्च न्यायालयात गेलो आणि मिंधे गट हायकोर्टात गेला आहे. जर त्यांनाही आपल्याला न्याय मिळालेला नाही असं वाटत असेल तर राज्यरपालांना विनंती आहे त्यांनी अधिवेशन बोलवावं. अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव आणा, मी तुम्हाला पाठिंबा देतो," असं उद्धव ठाकरेंनी जाहीर केलं.
"व्हीप आमचाचा अधिकार आहे. व्हीप म्हणजे मराठीत चाबूक असतो. तो लाचारांच्या हाती शोभत नाही़. तुमची लायकी आहे का अध्यक्ष होण्याची?," अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. आपण निवडणूक आयोगावर केस दाखल केली पाहिजे. आपण शपथपत्रं, प्रतिज्ञापत्र दिली होती. त्याची काय गादी करुन झोपले होते का? आमचे हक्क द्या आणि किंवा पैसे परत करा. हा निवडणूक आयोगाचा मोठा घोटाळा आहे असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला.
राज्यपाल म्हणून दुसरा नोकर बसवला होता. डोकं नाही सगळंच कानं आहे त्यांचं. राज्यपाल या कटात सहभागी झाले होते असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला. लोकशाही जिवंत आहे की नाही, सुप्रीम कोर्ट की विधानसभा अध्यक्ष यांचा निर्णय वैध याची ही लढाई आहे. या भूमीत लोकशाहीचे हत्यारे जन्माला येत आहेत हे दुर्दैव आहे. पण महाराष्ट्रातील माती अशा गद्दारांना गाडून टाकते असंही ते म्हणाले.
1999 मध्ये दिलेलं संविधान शेवटचं असेल असं मानायचं झालं तर 2014 मध्ये मला काय म्हणून मोदींना पाठिंबा देण्यासाठी बोलावलं होतं? माझी सही कशाला घेतली होती? अशी विचारणा उद्धव ठाकरेंनी केली. त्यावेळी नरेंद्र मोदींनी सल्लामसलत करण्यासाठी उद्धव ठाकरेंशी बोलतो असं सांगितलं होतं. मग ते कशासाठी बोलले होते? असंही ते म्हणाले.
मी कोणीच नव्हतो तर माझ्या पाठिंब्यावर देवेंद्र फडणवीसांनी 5 वर्षं मुख्यमंत्रीपद कोणाच्या पाठीवर उबवलं? मिंधेंना पंदं कोणी दिली? मी तुला पदं, एबी फॉर्म, मंत्रीपदं दिली होती की नव्हती? अशी विचारणा करताना पंचतारांकित शेती आणि हेलिपॅड असणारा घरगडी पाहिला नाही असा टोलाही लगावला.