Tejas Thackeray : कुटुंबातील जवळपास प्रत्येकजण राजकारणात बऱ्यापैकी सक्रीय असतानाच ठाकरे कुटुंबातील सर्वाल धाकटे सदस्य अर्थात उद्धव आणि रश्मी ठाकरे यांचे चिरंजीव तेजस ठाकरे मात्र सध्या निसर्गात रमल्याचं पाहायला मिळत आहे. पर्यावरण, निसर्ग आणि जीवसृष्टीचा जवळून अभ्यास करणाऱ्या तेजस ठाकरे यांच्या टीमनं एक किमया केली आहे.
पश्चिम घाटमाध्यावरील परिसरात तेजस ठाकरे यांच्या टीमला एक साप आढळला असून, त्याला 'सह्याद्रीओफिस' (Sahyadriofis) असं नाव देण्यात आलं आहे. टीमला मिळालेल्या या यशामुळं ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनच्या (Thackeray Wildlife Foundation) च्या नावे आणखी एका यशस्वी मोहिमेची नोंद झाली आहे.
प्राथमिक माहितीनुसार ठाकरे वाईल्ड लाईफ फाऊंडेशननं लंडन येथील नॅचरल हिस्ट्री म्युझियम, जर्मनीतील मॅक्स प्लॅन्क इन्स्टीट्युट यांच्यासह हर्षित पटेल आणि तेजस ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली ही मोहिम यशस्वीरित्या पार पाडली.
नव्यानं निरीक्षणात आलेल्या सापाच्या या प्रजाचीला 'सह्याद्रीओफीस' हे नाव देण्यात आलं असून, यामध्ये सह्याद्रीचा अगदी स्पष्ट उल्लेख आहे. पश्चिम घाट परिसराला संस्कृत भाषेत सह्याद्री असं संबोधलं जातं. तर, ओफीस (Ophis) हा मुळचा ग्रीक शब्द असून, त्याचा अर्थ होतो साप. या प्रजातीला 'उत्तरघाटी' असं नाव देण्यात आलं आहे. इथं उत्तर याचा अर्थ उत्तर दिशेला अनुसरून घेण्यात आला आहे, तर घाटीचा संदर्भ डोंगररांगा आणि घाटमाध्यावरील परिसराला अनुसरून घेण्यात आला आहे.
सहसा जीवसृष्टीशी संबंधित अशा प्रजातींना सहसा त्याचा शोध लावणाऱ्या व्यक्तीचं किंवा त्या ठिकाणाचं नाव दिलं जातं. तेजस ठाकरे यांच्या टीमनं केलेल्या या संशोधनामुळं सह्याद्रीचंही नाव जगभरात पोहोचलं असून, यापुढंही जगात ही प्रजाती सह्याद्रीओफीस याच नावानं ओळखली जाईल.
तेजस ठाकरे यांनी कायमच निसर्गाशी संबंधित अनेक घटकांचा अभ्यास आणि निरीक्षण केल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यांना जैवविविधतेसंदर्भातील सखोल ज्ञानही आहे. आतापर्यंत त्यांनी अनेक मासे, पाली आणि खेकड्यांच्या जवळपास 11 हून अधिक दुर्मिळ प्रजातींचा शोध लावला असून, त्यांना नावंही दिली आहेत. निसर्गात वावरणाऱ्या अनेक प्रजातींना त्यांनी नवी ओळख मिळवून दिली आहे. त्यांच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये आता सह्याद्रीओफीस सापाचीही भर पडली आहे.