कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे : ऐन नवरात्रौत्सवात (Navratri 2022) ठाण्यात ठाकरे विरुद्ध शिंदे गट (Thackeray Group vs Shinde Group) पुन्हा आमनेसामने येणाराय. निमित्त आहे ते रश्मी ठाकरेंच्या (Rashmi Thackeray) दौऱ्याचं. आनंद दिघेंच्या (Anand Dighe) देवीच्या दर्शनाला रश्मी ठाकरे ठाण्याला जाणार आहेत. त्यांच्या या दौ-यामुळं वादाची ठिणगी पेटणार का, पाहूयात हा रिपोर्ट. (uddhav thackeray wife rashmi thackeray thursdat 29 september in thane for tembhi naka devi darshan)
शिवसेनेतला ठाकरे विरुद्ध शिंदे संघर्ष शिगेला पोहोचलाय. गल्लीपासून दिल्लीपर्यंत या संघर्षाची धग जाणवतेय. आता देवीच्या दरबारातही ठाकरे आणि शिंदे गट आमनेसामने उभे ठाकणार आहेत. त्यासाठी निमित्त ठरणाराय तो रश्मी ठाकरेंचा ठाणे दौरा. गुरुवारी रश्मी ठाकरे ठाण्यात म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात जाणार आहेत. ठाण्यातील टेंभी नाका इथल्या अंबामातेचं दर्शन त्या घेणार आहेत.
आनंद दिघेंची देवी, टेंभी नाक्याची देवी, ठाण्याची दुर्गेश्वरी अशा विविध नावांनी ही देवी ओळखली जाते. स्वर्गीय आनंद दिघे यांनी 1978 साली टेंभी नाक्यावर नवरात्रौत्सव सुरू केला. गोरगरीब आणि सामान्य ठाणेकरांना गरबा आणि नवरात्र उत्सवाचा आनंद घेता यावा, यासाठी त्यांनी हा उत्सव सुरू केला.
यंदा या नवरात्रौत्सवाचं 46 वं वर्ष आहे. टेंभी नाका जय अंबे मंडळावर सध्या एकनाथ शिंदे गटाचा वरचष्मा आहे. मात्र आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघे यांना ठाकरे गटानं ठाणे जिल्हा प्रमुखपदाची जबाबदारी दिलीय. त्यामुळं रश्मी ठाकरेंच्या दौ-याच्या वेळी अंबेमातेच्या दरबारातच दोन्ही गटांमध्ये पुन्हा खटका उडण्याची शक्यता आहे. मात्र देवीच्या दरबारात कसलंही राजकारण होणार नाही, अशी ग्वाही शिंदे गटाकडून दिली जातेय...
याआधी देखील रश्मी ठाकरेंनी शिंदेंच्या बालेकिल्ल्यात एन्ट्री केली होती. गणेशोत्सव काळात मंगळागौरीच्या निमित्तानं रश्मी ठाकरे ठाण्यात आल्या होत्या. एकनाथ शिंदे गटाला ठाण्याच्या बालेकिल्ल्यातच काटशह देण्यासाठी ठाकरे गटानं ही नवी रणनीती आखलीय. रश्मी ठाकरे त्यासाठी स्वतः मैदानात उतरल्यात. रश्मी ठाकरे यांच्यापाठोपाठ उद्धव ठाकरे देखील टेंभी नाका नवरात्रौत्सवाला भेट देणार का याकडे सर्वांचं लक्ष असेल.