बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या अखेरच्या सामन्यात मोक्याच्या क्षणी भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह जखमी झाल्याने संघाला त्याची मोठी किंमत मोजावी लागली. दरम्यान या निमित्ताने भारतीय गोलंदाजांवरील वर्कलोड या विषयावर चर्चा सुरु झाली आहे. ऑस्ट्रेलियाविरोधातील कसोटी मालिकेत जसप्रीत बुमराहने एकूण 151.2 ओव्हर्स टाकल्या. दुसरीकडे मोहम्मद सिराजने 164.1 षटके टाकली. बुमराह जखमी झाला असल्याने तो आयसीसी चॅम्पिअन्स ट्रॉफी 2025 मध्ये खेळण्याची शक्यताही कमी आहे. पण 1983 वर्ल्डकप विजेत्या संघाचे खेळाडू बलविंदर संधू (Balwinder Sandhu) यांनी वर्कलोड म्हणजेच कामाचा ताण ही परदेशी संकल्पना असून, जर एखादा गोलंदाज एका सामन्यात 20 ओव्हर्स टाकू शकत नसेल तर मग त्याने भारतासाठी खेळण्याचं स्वप्न पाहू नये असं स्पष्ट शब्दात सांगितलं आहे.
जसप्रीत बुमराहच्या वर्कलोडवर बोलताना बलविंदर संधू यांनी आपलं मत स्पष्टपणे मांडलं आहे. "वर्कलोड? जसप्रीत बुमरहाने किती ओव्हर्स टाकल्या? 150 का काहीतरी, बरोबर ना? म्हणजे त्याने प्रत्येक डावात 16 किंवा प्रत्येक सामन्यात 30 ओव्हर्स टाकल्या. त्याने 15 पेक्षा जास्त ओव्हर्स एकाच दमात टाकलेल्या नाहीत. त्याने स्पेलप्रमाणे गोलंदाजी केली. त्यामुळे ही काय फार मोठी बाब नाही," असं बलविंदर संधू यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी संवाद साधताना सांगितलं.
"वर्कलोड मॅनेजमेंट हा मूर्खपणाचा प्रकार आहे. या ऑस्ट्रेलियन गोष्टी आहेत, ज्या त्यांनी तयार केल्या आहेत. मी त्या काळातील आहे जेव्हा क्रिकेटर्स इतक कोणाचं नाही तर आपल्या शरिराचं म्हणणं ऐकत असत. मी याच्याशी अजिबात सहमत नाही," असं त्यांनी स्पष्ट केलं.
वर्कलोड मॅनेजमेंट हा बुमराहच्या कारकिर्दीचा एक मोठा पैलू आहे. विशेषत: त्याच्या वेगळ्या शैलीमुळे त्याला प्राधान्य दिलं जातं. तथापि, संधू यांनी कपिल देव यांच्यासारख्या खेळाडूंचे उदाहरण घेऊन हे अधोरेखित केले की दिवसातून 15-20 षटके गोलंदाजी करणे फार मोठा प्रश्न नाही.
"आम्ही दिवसातून 25 ते 30 ओव्हर्स टाकायचो. कपिल देव यांनी आपल्या करिअरमध्ये अनेकदा एका दमात गोलंदाजी केली आहे. जेव्हा तुम्ही सतत गोलंदाजी करता तेव्हा तुमचं शरीर आणि स्नायूंना सवय होते," असंही ते म्हणाले.
आपलं परखड मत मांडताना संधू म्हणाले की, बुमराह किंवा इतर कोणताही गोलंदाज जो सतत गोलंदाजी करण्यात अपयशी ठरत असेल त्याने देशासाठी खेळण्याचा विचार सोडून द्यावा.
"आज तुमच्या शरिराची काळजी घेण्यासाठी तुमच्याकडे सर्वोत्तम फिजिओ, मसाज आणि डॉक्टर आहेत. जर एखादा गोलंदाज एका डावात 20 ओव्हर्स टाकत नसेल, तर त्याने भारतासाठी खेळण्याचा विचार सोडून द्यावा," असंही ते म्हणाले.