नाशिक : Unique Marriage :हौसेला मोल नसते असे म्हणतात, पण त्यातही हौस शेतकऱ्याची असेल तर विचारायलाच नको. याचा प्रत्यय नुकताच नाशिक शहरात झालेल्या एका विवाह सोहळाप्रसंगी आला. 21 एप्रिल रोजी गंगापूर बालाजी लॉन्स येथे झालेल्या विवाह सोहळ्यात नवरी नवरदेवाला चक्क 200 फूट हवेतून गरुड रथातून विवाहस्थळी दाखल झाल्याने याची गावभर चर्चा सुरु झाली आहे.
पिंपळगाव बहुला येथील प्रगतशील शेतकरी सुदाम भावले यांची कन्या नीलम हिचा विवाह अंबड येथील क्रेन व्यवसायिक सुभाष शेळके यांचा मुलगा मोहन याच्याशी झाला. विवाहाआधी हे नवं दाम्पत्य हवेतून गरुड रथातून मंडपात दाखल झाले.
विवाह आगळ्यावेगळ्या पद्धतीने झाला पाहिजे अशी मुलीचे वडील सुदाम भावले यांनी इच्छा व्यक्त केली होती. याला मुलीच्या सासऱ्यांसह कुबीयांनी साथ देत नवरी नवरदेवासह क्रेन द्वारे गरुड रथ 200 फूट हवेतून विवाह स्थळी आणण्यात आले.
मुलीचे लग्न कायम स्मरणात राहावं यासाठी वडील सुदाम भावले आणि भावले कुटुंबीय गेल्या एक महिन्यापासून नियोजन करत होते, यात अनेक अडचणींना देखील तोंड द्यावे लागले. या गरुड रथातील एन्ट्रीने हा लग्नसोहळा चांगलाच चर्चेत आला असून या कल्पकतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. या विवाहाचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.