कोकणात धुमशान! रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात नारायण राणे वि. विनायक राऊत 'सामना'

Loksabha 2024 Ratnagiri-Sindhudurga : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातला महायुतीचा तिढा अखेर सुटलाय. भाजपाकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाकडून विनायक राऊत यांच्यात धूमशान रंगणाराय. काय आहेत इथली राजकीय गणितं. पाहूयात पंचनामा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा.

राजीव कासले | Updated: Apr 18, 2024, 08:59 PM IST
कोकणात धुमशान! रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात नारायण राणे वि. विनायक राऊत 'सामना' title=

उमेश परब, झी मीडिया : रत्नागिरी सिंधुदुर्ग... (Ratnagiri-Sindhudurga Loksabha Constituency) रत्नागिरीतल्या चिपळूणपासून सिंधुदुर्गातील सावंतवाडीपर्यंत पसरलेला कोकणातला निसर्गरम्य परिसर. गणपतीपुळ्याचं पवित्र देवस्थान, आंगणेवाडीची भराडीदेवी, छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास सांगणारा सिंधुदुर्ग किल्ला इथलाच. नाथ पै आणि मधु दंडवते यांच्यासारख्या सेवाव्रतींचा वारसा लाभलेला मतदारसंघ. पण नैसर्गिक सुबत्ता असली तरी विकासाच्या बाबतीत कायम पिछाडीवर राहिलेला हा भाग.

रत्नागिरी सिंधुदुर्गचं गाऱ्हाणं 
सिंधुदुर्गची ओळख महाराष्ट्रातला पहिला पर्यटन जिल्हा अशी आहे. मात्र गोव्याच्या तुलनेत पर्यटनाचे आराखडे कागदावरच राहिले. तब्बल 14 वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्ग रखडलायशेतकरी, आंबा-काजू बागायतदार, मच्छिमारांचे प्रश्न प्रलंबितच आहेत. पूर्वी राजापूर असा लोकसभा मतदारसंघ होता. 2009 सालच्या पुनर्रचनेनंतर हा नवा मतदारसंघ अस्तित्वात आला.

रत्नागिरी सिंधुदुर्गचं राजकीय गणितं
2009 मध्ये काँग्रेसचे निलेश राणे यांनी शिवसेनेचे सुरेश प्रभू यांचा 46 हजार मतांनी पराभव केला. 2014 मध्ये मोदी लाटेत शिवसेनेचे विनायक राऊत यांनी काँग्रेसच्या निलेश राणेंना दीड लाख मतांनी हरवलं. 2019 मध्ये नारायण राणेंनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून निलेश राणेंनी निवडणूक लढवली. मात्र राऊतांनी त्यांना पुन्हा एकदा पराभूत केलं. विधानसभेचा विचार केला तर शिवसेना ठाकरे गटाचे 2, शिवसेना शिंदे गटाचे 2, राष्ट्रवादीचा 1 आणि भाजपचा 1 आमदार आहे

नारायण राणे वि.विनायक राऊत
शिवसेना ठाकरे गटाकडून सलग तिसऱ्यांदा विनायक राऊत (Vinayak Raut) निवडणूक लढवत आहेत. मात्र आता भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट अशी महायुती झाल्यानं राऊतांच्या अडचणी वाढल्यात.  शिवसेना शिंदे गटाकडून किरण सामंत इच्छुक होते. ही जागा पदरात पाडून घेण्यासाठी त्यांनी बरीच खटपट केली. अखेर केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या (Narayan Rane) नावावर भाजपनं शिक्कामोर्तब केलं.

शिवसेना ठाकरे गट (Shivsena Thackeray Group) आणि नारायण राणे यांचं विळ्या भोपळ्याचं नातं आहे. एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी ते गमावत नाहीत. त्यामुळं राणे विरुद्ध राऊत असं कोकणी धूमशान यावेळी रत्नागिरी सिंधुदुर्गात चांगलंच रंगणाराय. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत कुडाळमधून शिवसेनेच्या वैभव नाईकांनी नारायण राणेंचा दारूण पराभव केला होता. त्या पराभवाची परतफेड करण्याची संधी आता राणेंना आहे.. राणे पराभवाचा वचपा काढणार की, विनायक राऊत हॅटट्रिक साधणार, याचा फैसला 4 जूनला होणाराय.