विधान परिषदेसाठी घोडेबाजार तेजीत? निवडणूक अटळ, 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात

विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात उतरलेत. त्यामुळे येत्या 12 जुलैला विधानपरिषदेच्या निवडणुकीवर शिक्कामोर्तब झालंय. या निवडणुकीत घोडेबाजार होणार असल्याच्या चर्चा सुरू झालेत. पाहुया त्यासंदर्भातलाच एक स्पेशल रिपोर्ट..

वनिता कांबळे | Updated: Jul 5, 2024, 08:26 PM IST
 विधान परिषदेसाठी घोडेबाजार तेजीत?  निवडणूक अटळ, 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात title=

Vidhan Parishad Election 2024:  विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात उतरल्यामुळे निवडणूक होणार हे अटळ आहे.. त्यासोबतच या निवडणुकीत घोडेबाजार होण्याचीही शक्यता वर्तवली जातेय.. महाविकास आघाडीनं संख्याबळापेक्षा एक उमेदवार जास्त उभा केलाय. विधान परिषदेच्या या मैदानात राज्यातील अनेक दिग्गज नेते उतरल्याचं पाहायला मिळतंय.  त्यामुळे या निवडणुकीत घोडेबाजार होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

पक्षनिहाय उमेदवार

पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खोत, अमित गोरखे आणि योगेश टिळेकर हे भाजपचे उमेदवार आहेत. कृपाल तुमाने, भावना गवळी हे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत.  शिवाजीराव गर्जे, राजेश विटेकर हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे  उमेदवार आहेत. काँग्रेसच्या प्रज्ञा सातव,  शिवसेना ठाकरे गटाचे  मिलिंद नार्वेकर आणि शेकापचे  जयंत पाटील हे महाविकासआघाडीचे उमेदवार आहेत. 

संख्याबळाचा विचार केला तर महाविकास आघाडीचे 69 आमदार आहेत. त्यांचे दोन उमेदवार निवडून येऊ शकतात. मात्र, मविआनं तीन उमेदवार दिल्यानं निवडणुकीत रंगत आलीय.. यामधलं एक महत्वाचं नाव म्हणजे मिलिंद नार्वेकर. नार्वेकर हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे स्वीय सहायक आहेत.. त्यांना विधान परिषदेमध्ये उतरवण्याचं कारण म्हणजे त्यांचे सर्वपक्षीय नेते आणि आमदारांशी असलेले सलोख्याचे संबंध.

अगदी शिंदेंच्या शिवसेनेतीलही काही मतं नार्वेकरांना मिळण्याची शक्यता वर्तवली जातेय.. मागील काही दिवसांपासून मिलिंद नार्वेकर हे भाजपच्या काही नेत्यांशी गुप्तगु करताना पाहायला मिळालं.. आशिष शेलार, प्रवीण दरेकर, राम कदम यांच्याशी मिलिंद नार्वेकरांची झालेली चर्चा हा चर्चेचा विषय ठरलाय... त्यामुळे भाजपचे आमदारही नार्वेकरांना मदत करणार का अशी चर्चा सुरू झालीय.

शिवसेना ठाकरे गटाच्या या खेळीमुळं धोक्यात आलेले उमेदवार म्हणजे शेकापचे जयंत पाटील... आता जयंत पाटलांना महायुतीचे किंवा काही अपक्ष आमदार मदत करणार का हे पाहणंही तितकंच महत्वाचं आहे.. 11 जागांसाठी 12 उमेदवार उभे असल्यानं नेमका कुणाचा गेम होतो, ते पाहायचं...