विधानपरिषद निवडणूक बिनविरोध नाही, काँग्रेस दोघांना उतरवणार, पहिल्या उमेदवाराची घोषणा

विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेसने पहिल्या उमेदवाराची घोषणा केली आहे.

Updated: May 9, 2020, 06:57 PM IST
विधानपरिषद निवडणूक बिनविरोध नाही, काँग्रेस दोघांना उतरवणार, पहिल्या उमेदवाराची घोषणा title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेसने पहिल्या उमेदवाराची घोषणा केली आहे. काँग्रेसकडून विधानपरिषदेसाठी राजेश राठोड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर काँग्रेस दुसरा उमेदवार लवकरच जाहीर करेल, असं प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी 'झी २४ तास'ला सांगितलं आहे. काँग्रेस २ जागांवर ठाम असल्यामुळे विधानपरिषदेच्या निवडणुका बिनविरोध होणार नाहीत, असंच चित्र सध्या दिसत आहे.

विधानपरिषदेसाठी भाजपने ४ उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. तर शिवसेना २ आणि राष्ट्रवादी काँग्रेस २ जणांना उमेदवारी देणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीने प्रत्येकी २-२ जणांना उमेदवारी दिली तर काँग्रेस एकच उमेदवार उतरवेल, अशी चर्चा होती, पण काँग्रेस २ उमेदवारांसाठी आग्रही आहे.

विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपच्या चारही उमेदवारांनी फॉर्म भरला. भाजपने प्रविण दटके, गोपीचंद पडळकर, अजित गोपछडे, रणजितसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी दिली आहे. तर शिवसेनेने उद्धव ठाकरे आणि नीलम गोऱ्हे यांची नावं निश्चित केली आहेत. शिवसेनेने ही दोन्ही नावं निश्चित केली असली, तरी त्यांची अधिकृत घोषणा मात्र अजून झालेली नाही. तर राष्ट्रवादी काँग्रेस अमोल मिटकरी आणि शशिकांत शिंदे यांना उमेदवारी देणार असल्याचा चर्चा आहेत.

कोरोना व्हायरसच्या लॉकडाऊनमुळे विधानपरिषद निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. विधानपरिषद निवडणुका पुढे ढकलण्यात आल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची खूर्ची आणि महाविकासआघाडी सरकारसमोर अडचणी निर्माण झाल्या होत्या.

विधानपरिषद निवडणुका पुढे ढकलण्यात आल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राज्यपालनियुक्त आमदार बनवण्यासाठी महाविकासाआघाडीने भगतसिंग कोश्यारी यांना दोनवेळा प्रस्ताव पाठवला. या प्रस्तावावर राज्यपालांनी स्वाक्षरी न करता निवडणूक आयोगाला विधानपरिषद निवडणूक घेण्याची विनंती केली. यानंतर निवडणूक आयोगाने विधानपरिषद निवडणुकांच्या कार्यक्रमाची घोषणा केली.

विधानपरिषदेच्या ९ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक होणार आहे. ११ मे हा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे, तर १४ मेपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. ९ पेक्षा जास्त जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तर मात्र विधानपरिषद निवडणुका होणार, हे अटळ आहे.