औरंगाबादमध्ये दोन गटात दंगल, जाळपोळीनंतर दगडफेकीत ३० जखमी

औरंगाबाद शहरात दोन गटांत राडा झाला. त्यानंतर शहरात दंगलीचे स्वरुप आले.  

Updated: May 12, 2018, 07:55 AM IST
औरंगाबादमध्ये दोन गटात दंगल, जाळपोळीनंतर दगडफेकीत ३० जखमी title=

औरंगाबाद : शहरात दोन गटांत राडा झाला. त्यानंतर शहरात दंगलीचे स्वरुप आले. वादातून मोठ्याप्रमाणात जाळपोळ करण्यात आली. जवळपास २५ दुकाने जाळण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, पोलिसांनी शांतता राखण्याचे आवाहन केले असून कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असे म्हटलेय.तसेच पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या. परिसरात असलेल्या इतरही गाड्यांची तोडफोड, जाळपोळ करण्यात आली आहे.

मोठा पोलीस बंदोबस्त

शहरात दोन गटांत भांडण झाले. त्यानंतर औरंगाबाद शहरात मध्यरात्रीनंतर दंगल उसळली असून जाळपोळ आणि दगडफेकीत सुमारे ३० जण जखमी झालेत. घटनेबाबत माहिती मिळताच पोलिसांनी मोठा बंदोबस्त घटनास्थळी ठेवला. वरिष्ठ अधिकारीही तातडीने घटनास्थळी दाखल झालेत. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न सुरू आहेत. लोकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आलेय. 

२५ दुकाने पेटवलीत, ३० जखमी

दरम्यान, दोन गटांत संघर्ष उफाळण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र किरकोळ भांडण होऊन त्याचे पर्यावसन दंगलीत झाल्याचे सांगण्यात येत आहे. दंगलखोरांनी शहरातील किमान २५ दुकानं पेटवून दिलीत. दोन्ही बाजूने एकमेकांवर तुफान दगडफेकही करण्यात आली आहे. यात ३०  लोक जखमी झालेत.

१० पोलीस जखमी 

दरम्यान, मोतीकारंजा परिसरातील अनधिकृत नळ कनेक्शन तोडण्यावरून झालेल्या वादातून दोन गटांत राडा झाल्याचे समोर येत आहे. तलावरी, चाकू, लाठ्याकाठ्यांसह जमावाने तुफान दगडफेक केली. जखमींमध्ये सहायक पोलीस आयुक्त गोवर्धन कोळेकर, क्रांती चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक श्रीपाद परोपकारी यांच्यासह दहा पोलिसांचा समावेश आहे. पोलिसांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली. यात पोलिसांच्या तीन गाड्या जाळण्यात आल्या. तेव्हा पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या. परिसरात असलेल्या इतरही गाड्यांची तोडफोड, जाळपोळ करण्यात आली आहे.