वाशिम पॅटर्न यशस्वी, कोरोनामुक्त व्यक्तीला टाळ्या वाजवून निरोप

 'वाशिम पॅटर्न' यशस्वीपणे राबवून जिल्हा आता कोरोनामुक्त झालाय.

Updated: Apr 25, 2020, 02:33 PM IST
वाशिम पॅटर्न यशस्वी, कोरोनामुक्त व्यक्तीला टाळ्या वाजवून निरोप  title=

जयेश जगड, झी मीडिया, वाशिम : कोरोनाच्या नकारात्मक वातावरणात वाशिममधून एक सकारात्मक बातमी आहे. वाशिममध्ये आज एकमात्र असलेला कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण कोरोनामुक्त झालाय. 'वाशिम पॅटर्न' यशस्वीपणे राबवून वाशिम जिल्हा आता कोरोनामुक्त झालाय. या कोरोना बाधित रुग्णाला आज जिल्हा सर्वोपचार रूग्णालयातून सुट्टी देण्यात आली .

वाशिम जिल्ह्यात कोरोनाची लागण असलेला एकमेव रुग्ण ३ एप्रिलला आढळून आला होता. या रुग्णावर जिल्हा रुग्णालयात तब्बल २१ दिवस उपचार करण्यात आले. या रुग्णाला आज जिल्हा प्रशासनातील अधिकारी, डाँक्टर्स, नर्सेस यांनी टाळ्या वाजवून निरोप दिलाय. उपस्थित वैधकीय सेवकांनी या रुग्णाला पुष्पगुच्छ, मास्क आणि सॅनिटायझर भेट वस्तू म्हणून दिल्या. 

या रुग्णाला पुढचे चौदा दिवस घरी गृह विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे. एकमात्र बाधित रुग्ण बरा झाल्याने वाशिम पॅटर्न यशस्वी ठरलाय.  मात्र यापुढील काळात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये, याकरिता जिल्ह्यात संचारबंदी आणि जिल्हाबंदी आदेशाची अतिशय कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत विना परवानगी प्रवेश करणाऱ्या ५५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र पुढच्या काळातही जनतेने प्रशासनाला सहकार्य करण्याची विनंती वाशिमचे जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी सांगितले.  

कोरोनामुक्त होणारा वाशिम जिल्हा हा पश्चिम विदर्भातला पहिला जिल्हा आहे. याचे खरे श्रेय इथले नागरिक, वैद्यकीय मंडळी, पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासनाचा आहे. तर ज्याप्रमाणे कोरोनाच्या लढाईत जनतेनी आतापर्यंत साथ दिली तशी साथ भविष्यात ही जनतेने द्यावी अशी अपेक्षा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी व्यक्त केली.