लातूरच्या मंदिरात नंदी दूध पीत असल्याचा दावा, व्हायरल व्हिडीओचे हे आहे शास्त्रीय कारण!

Nandi Drinking Milk Video Viral:  मंदिरातील नंदी पाणी, दूध खरंच पितो का?... लातूर जिल्ह्यात ठिकठिकाणी चमत्काराची अफवा. पसरली आहे. नंदी पाणी दूध पिण्याच्या चमत्कार करून दाखवणाऱ्याला अंनिस कडून बक्षीस जाहीर. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jul 27, 2023, 12:40 PM IST
लातूरच्या मंदिरात नंदी दूध पीत असल्याचा दावा, व्हायरल व्हिडीओचे हे आहे शास्त्रीय कारण! title=
Watch Viral Video Latur Mahadev Mandir Nandi Drinking Milk Latest Marathi News

वैभव बालकुंदे, झी मीडिया 

लातूरः मंदिरातील नंदी पाणी, दूध खरंच पितो का? असं कसं होईल? तुम्हालाही खरंच असा प्रश्न पडलाय का?  लातूर जिल्ह्यात सध्या हा विषय चर्चेत आहेत. जिल्ह्यातील अनेक भागात या  चमत्काराची अफवा पसरली आहे. तसे, व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. हे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अंधश्रद्ध निर्मूलन समितीने मात्र यावर आक्षेप घेत चमत्काराची अफवा उठवणाऱ्या व्यक्तीला ओपन चॅलेंज दिले आहे. 

लातूर जिल्ह्यातील अनेक भागात नंदी दूध आणि पाणी पीत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मंदिरामध्ये ठिकठिकाणी भाविकांनी गर्दी करून नंदीला दूध पाजण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. यावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने हा कुठलाही चमत्कार नसून हि अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे. 

लातूर जिल्ह्यातील महाळंग्रा, दावतपूर आणि आर्वी  या गावातील महादेव मंदिरातील नंदी दूध पित असल्याची अफवा पसरली. त्यानंतर मंदिरासमोर तुफान गर्दी जमा झाली होती. या घटनेचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यात नंदीच्या मूर्तीला भाविक चमच्याच्या सहाय्याने पाणी पाजत आहेत. अधिक महिन्यातील अष्टमीचा संदर्भ जोडून अनेकांनी हा चमत्कार असल्याचा दावा करत सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल केले. मात्र अंनिसने हा दावा खोडून काढत यामागे शास्त्रीय कारण असल्याचे स्पष्ट केले आहे. 

कोणतीही धातूची, दगडी किंवा लाकडाची मूर्ती दूध किंवा द्रव पदार्थ पीत नाही. नंदीची मूर्ती पाणी किंवा दूध खेचते ते केवळ पृष्टीय ताण किंवा सरफेस टेन्शन या वैज्ञानिक तत्वामुळं. त्याला केशाकर्षण नियम असंही म्हणतात. त्यामुळं प्रत्यक्षात मूर्ती दूध किंवा पाणी पित असल्याचा भास होतो. मात्र ही निव्वळ अफवा आहे, असं अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष माधव बागवे यांनी स्पष्ट केले आहे.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीने अशा अफवा पसरवणाऱ्या लोकांना ओपन चॅलेंज दिले आहे. ही सगळी अफवा आहे. खरंच नंदी दूध आणि पाणी पिण्याचा चमत्कार दाखवणाऱ्याला सात लाखाचे बक्षीस अंनिसकडून देण्यात येईल, असं त्यांनी म्हटलं आहे.