अहमदनगर : आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आता उत्तर नगर जिल्ह्यात पाणी प्रश्नावरुन आंदोलनं सुरु झाली आहेत. निळवंडे धरणाच्या कालव्यांच्या कामावरुन जिल्ह्यांतर्गत संघर्ष पेटला आहे. गेल्या ४० वर्षांपासून निळवंडे धरणाचं पाणी आपल्या शेतशिवारात येईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. यासाठी १८२ गावातील नागरिकांनी धरणाच्या मुखाजवळील कालव्यांची कामं सुरु करा. अशी मागणी करत गेल्या आठवड्यात तब्बल तीन तास रास्तारोको आंदोलन केलं होतं. त्याविरोधात आता राष्ट्रवादीचे अकोलेचे आमदार वैभव पिचड यांच्या नेतृत्वाखाली कोल्हार घोटी रस्त्यावर आंदोलन केलं.
निळवंडे धरणाच्या कालव्यांसाठी जमिनी अधिग्रहण करुन अनेक वर्षे झाली आहे. शेतकऱ्याची परिस्थिती बदलल्याने आता कालवे भूमीगत करावे अशी मागणी होच आहे. काळेवाडी आणी खिळपाट पाझर तलावाचे काम सुरू करण्याची मागणी देखील आहे. तालुक्यातील रस्त्यांची कामे मार्गी लावा, तालुक्यातील गावांच्या पाणी योजनांचे सर्व्हेक्षण करा, पुलांची रखडलेली कामे सुरू करा यासह अनेक मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं.