आम्ही पण माणसं आहोत, आम्हालाही मदत करा: तृतीयपंथीयांची साद

तृतीयपंथी हा समाजातील दुर्लक्षित घटक, भीक मागून पोट भरणारा. या घटकावर लॉकडाऊनमुळे जगण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. 

Updated: May 19, 2020, 12:46 PM IST
आम्ही पण माणसं आहोत, आम्हालाही मदत करा: तृतीयपंथीयांची साद title=

आतिष भोईर, कल्याण : तृतीयपंथी हा समाजातील दुर्लक्षित घटक, भीक मागून पोट भरणारा. या घटकावर लॉकडाऊनमुळे जगण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. 31 मे पर्यंत पुन्हा एकदा लॉकडाऊन वाढवण्यात आला. त्यामुळे आता जगायचं कस, असा यक्षप्रश्न कल्याणमधील कचोरे परिसरातील 70  तृतीयपंथीपुढं उभा राहिला असून, त्यांच्यावर आता उपासमारीची वेळ आली आहे. कोणतीही नोकरी नाही. कोणताही व्यवसाय नाही. शिक्षण असूनही कोणी काम देत नाही, अश्या परिस्थितीत तृतीय पंथीयासमोर भीक मागून जगण्याशिवाय पर्याय नसतो. कोरोनाच्या महामारीमुळे २४ मार्च पासून लॉकडाऊनला सुरुवात झाली. 

गेल्या 2 महिन्यांपासून तृतीयपंथीयाच्या जगण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. शिक्षित असूनही समाजाने नाकारल्यामुळे काहींना नाईलाजाने भीक मागावी लागत आहे. लॉकडाऊनमूळे रेल्वे, दुकाने सर्वच बंद आहेत. त्यामुळे उपासमारीची वेळ आल्याने घरभाडे देणे तर दूर आम्हाला खाण्याचीही भ्रांत दिसत आहे असं त्यांनी म्हटलं आहे.

समाजातील गोरगरीब, मजूर, वंचित घटकाला सरकारकडून, प्रशासनाकडून मदतीचा हात दिला, पण तृतीयपंथीयाकडे कायम दुर्लक्ष केलं जातं. आणि आताच्या गंभीर परिस्थितीतही त्यांच्याकडे कोणाचंही लक्ष नाही. काही सामाजिक संस्थांकडून जीवनावश्यक वस्तूचं वाटप करण्यात आलं पण आता तेही संपलं आहे. घरात अन्नाचा कण नाही, आता पोट कसं भरायचं असा प्रश्न त्यांना पडला आहे. आम्ही पण माणसं आहोत.  आम्हालाही मदत करा अशी कळकळीची विनंती तृतीयपंथी करत आहेत. शासनाने त्यांच्यातडे लक्ष देण्याची मागणी या तृतीयपंथीयांनी केली आहे.