PM Modi in Shirdi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शिर्डी दौऱ्यावर आहेत. शिर्डीतील दौऱ्याची सुरूवात करण्यापूर्वी पीएम मोदींनी (PM Modi) साईबाबांचं दर्शन घेतलं. यावेळी मोदींच्या हस्ते साईबाबांची पाद्यपूजा आणि आरती करण्यात आली. पीएम मोदी यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, अजित पवार उपस्थित होते. पीएम मोदी यांच्या हस्ते शिर्डीतील विकासकामांचं लोकार्पण करण्यात आलं. यानंतर पीएम मोदी यांनी शेतकरी सभेला संबोधित केलं. आपल्या भाषणात पीएम मोदी यांनी गेल्या नऊ वर्षात महाराष्ट्र आणि देशात करण्यात आलेल्या विकासकामांचा आलेख सांगितला. आधी करोड रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या बातम्या येत होत्या, आता कोट्यवधी रुपयांच्या विकासाच्या बातम्या येतात, आयुष्यमान भव आणि अंत्योदय योजनेसाटी 4 लाख कोटी रुपये खर्च केले, विश्वकर्मा योजनेसाठी 13 हजार कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.
शरद पवारांवर थेट निशाणा
शिर्डीतील जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट थेट शरद पवारांवर (Sharad Pawar) निशाणा साधला. माजी कृषीमंत्री राहिलेल्या शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं? असा सवाल त्यांनी अजित पवारांच्या (Ajit Pawar) उपस्थितीतच केला. मी पवारांचा वैयक्तिक सन्मान करतो, पण शेतकऱ्यांसाठी काय केलं? अशी विचारणा मोदींनी केली. आम्ही सच्च्या मनाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी काम करतोय, पण महाराष्ट्रातील एका नेत्यांने शेतकऱ्यांच्या नावाखाली केवळ राजकारण केलं.
महाराष्ट्रातील एक नेता केंद्र सरकारमध्ये अनेक वर्ष कृषीमंत्री होते, त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं. सात वर्षांच्या आपल्या कार्यकाळात त्यांनी देशभरातील शेतकऱ्यांकडून साडेतीन लाख करोड रुपयांच्या एमएसपीवर धान्य खरेदी केलं. आमच्या सरकारने सात वर्षात एमएसपीच्या स्वरुपात साडेतेरा लाख करोड रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात टाकले आहेत. शरद पवार कृषी मंत्री होते, त्यावेळी शेतकऱ्यांना आपल्या हक्काच्या पैशासाठीही मधल्या लोकांच्या भरवशावर राहावं लागत होतं, महिनोमहिने शेतकऱ्यांना पैसे मिळत नव्हते. पण आमच्या सरकारने शेतकऱ्यांचा पैसा एमएसपीच्या स्वरुपात त्यांचा खात्यात टाकण्याची सुविधा दिली आहे असं पीएम मोदी यांनी सांगितलं,
निलवंडे धरणाचं लोकार्पण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अहमदनगर येथील निळवंडे प्रकल्पाच लोकार्पण करण्यात आलं 8.43 पीएमसी पाणी क्षमता असलेल्या या धरणाचा पाच तालुक्यातील 110 गावांना फायदा होणार आहे. ठाणे आणि नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या अकोल्या तालुक्यातील निळवंडे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी तब्बल 46 वर्षांचा कालावधी लागला. स्थानिकांचा विरोध आणि राजकारण्यांमुळे धरण पूर्णत्वास जाण्यास अनेक अडचणी आल्या मोठ्या प्रतीक्षेनंतर अखेर आज पंतप्रधानांच्या हस्ते धरणाचा लोकार्पण सोहळा पार पडला.
अकोले तालुक्यातील 450 हेक्टरवर असलेल्या निळवंडे धरणाची पाणी साठवण क्षमता 8.32 टीएमसी इतकी आहे. या धरणामुळे अकोले, संगमनेर, राहता, कोपरगाव, सिन्नर या पाच तालुक्यातील 110 गावांच्या सिंचनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. स्थानिकांच्या विरोधामुळे सुरुवातीला हे धरण महाळादेवी या ठिकाणावरून हलवून हा प्रकल्प निळवंडे या गावात पूर्ण करण्यात आला. स्थानिकांचा पुनर्वसन करून शेतीसाठीच्या पाण्याचा प्रश्नाबाबत सरकारने हमी दिल्यानंतर निळवंडे प्रकल्प पूर्ण करण्याचा मार्ग मोकळा झाला. निळवंडे धरणाला 1977 साली पहिली प्रशासकीय मंजुरी मिळाली. त्यावेळी प्रकल्पाचा अंदाजीत खर्च दहा कोटी रुपये होता. आज प्रकल्प पूर्ण होत असताना यासाठी 5700 कोटी रुपयांचा खर्च झालेला आहे. वेळोवेळी प्रकल्पाची खर्च वाढत असल्याने देखील हा प्रकल्प रखडला प्रकल्प रखडण्याची कारणे अनेक असली तरी संगमनेर राहता कोपरगाव या मतदारसंघातील राजकीय नेते मात्र आपणच हा प्रकल्प पुढे नेऊ शकतो आणि आपल्या मतदारसंघातील शेतकऱ्यांना पाणी मिळवून देऊ शकतो असे सांगत तब्बल 25 वर्ष राजकारण केलं.