Shivaji Maharaj Statue Collapse: शिल्पकाराची क्षमता ते उणीवा... शिवरायांच्या पुतळ्याच्या बाबतीत नेमकं काय चुकलं? इतिहासकार स्पष्टच बोलले...

मालवणमधील राजकोटवर उभारलेला महाराजांचा पुतळा कोसळला आणि महाराष्ट्रात सर्वत्र नाराजी पसरली. इतिहासप्रेमींपासून इतिहासकारांपर्यंत अनेकजण याविषयी आपली मतं व्यक्त करत आहेत. कोल्हापुरचे इतिहासकार इंद्रजित सावंत यांनी प्रसंगी आक्षेप नोंदवले आहेत. काय आहेत त्यांचे आक्षेप?

Updated: Aug 28, 2024, 04:01 PM IST
Shivaji Maharaj Statue Collapse: शिल्पकाराची क्षमता ते उणीवा... शिवरायांच्या पुतळ्याच्या बाबतीत नेमकं काय चुकलं? इतिहासकार स्पष्टच बोलले... title=

Malvan Shivaji Maharaj Statue Collapse: मालवणमधील राजकोटवर उभारलेला महाराजांचा पुतळा कोसळला आणि महाराष्ट्रात सर्वत्र नाराजी पसरली. इतिहासप्रेमींपासून इतिहासकारांपर्यंत अनेकजण याविषयी आपली मतं व्यक्त करत आहेत. कोल्हापुरचे इतिहासकार इंद्रजित सावंत यांनी प्रसंगी आक्षेप नोंदवले आहेत. काय आहेत त्यांचे आक्षेप?

ते महाराज वाटतंच नव्हते... 
'झी 24तास'शी संवाद साधताना इंद्रजित सावंत म्हणाले "अनावरण झाल्यानंतर छायाचित्रात पाहूनच कळले की शिल्पशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत निकृष्ट दर्जाचे शिल्प बनवण्यात आले आहे. इथं नामवंत शिल्पकारांच्या कलाकृतींचा अभ्यास करुन नंतर शिल्प तयार करायला हवे होते. ते शिवाजी महाराज वाटतच नव्हते. हातातील तलवार, म्यान, वेशभुषा सगळंच चुकीचं बनवलं होतं हे कोणताही सामान्य माणुसपण सांगेल.'' 

जिरेटोप आणि दाढी आहे म्हणून महाराज म्हणायचं का?

सावंतांनी  जिरेटोप आहे दाढी आहे म्हणून महाराज म्हणायचं का? असा थेट सवाल यावेळी केला. शिवलंकेच्या समोर छत्रपतींनी बांधून घेतलेला राजकोट हा मराठ्यांच्या आरमाराचे आश्रय स्थान होते, अशा महत्त्वाच्या ठिकाणी उभारला जाणारा पुतळा तयार करायची जबाबदारी ज्यांनी आतापर्यंत एक-दिड फुटांच्याच मुर्त्या बनवल्या आहेत अशा नवसिख्या शिल्पकारांना दिली गेली, याविषयी त्यांनी खंत व्यक्त केली. महाराष्ट्र ही शिल्पकारांची खाण आहे महान शिल्पकार गणपतराव म्हात्रे, पुण्यात महाराजांचा पुतळा उभारणारे विनायक करमरकर अशी भरपुर नावे आहेत. असे शिल्पकार असताना नवख्या व्यक्तीला काम दिलं जाणं... असं म्हणत शिल्पकाराच्या कामावरही त्यांनी नाराजीचा सूर आळवला. 

शिल्पकारांना बेढब शिल्पचं उभारायचं होतं का?
4 डीसेंबर 2023 ला जेव्हा पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण झालं तेव्हाचं मी आणि मालवणच्या रहिवाश्यांनी आक्षेप घेतला होता. आम्ही तेव्हाच सांगितलं होत की शिल्प बेढब आहे ते बदला, आमचं तर सोडा छत्रपतींचे वारसदार संभाजीराजेंनी 12 डीसेंबर 2023 ला पंतप्रधानांना पत्र लिहून पुतळ्याविषयी तक्रार केली होती तरीसुध्दा कारवाई झाली नाही. त्यामुळे शिल्पकारांना बेढब शिल्पचं उभारायचं होतं की काय अशी शंका येते, अशा थेट शब्दांत त्यांनी झाल्या प्रकारावर ताशेरे ओढले. 

पुतळे उभारण्यापेक्षा इतिहास जपा....
महाराजांचे गड-दुर्ग त्यांची जिवंत स्मारकं आहेत, सिंधुदुर्गसारख्या किल्ल्यांची चालु असलेली पडझड थांबवणे गरजेचे आहे प्रथम शिल्लक बुरुजांची डागडुजी करा मोठे-मोठे पुतळे बांधायची स्पर्धा का लागली आहे ते कळत नाही, अशा शब्दांत त्यांनी संपात व्यक्त केला.  पुतळे उभारुन इतिहास पुढे जात नाही आधीच असलेल्या पुतळ्याचे संवर्धन जतन करा असा स्पष्ट संदेश देत त्यांनी या प्रकरणातील उणीवा आणि वस्तुस्थिती मांडली.