शाळेतल्या मुलांना गुन्हेगारीविश्वात ढकलणाऱ्या आरोपीला बेड्या; चुहा गँगच्या प्रमुखाला अखेर अटक

Pune Crime : गेल्या पाच महिन्यांपासून फरार असलेल्या मोक्कातील आरोपीला पकडण्यात पुणे पोलिसांना अखेर यश आले आहे. गेले कित्येक दिवस आरोपी आपली ओळख लपवून राहत होता. यासोबत तो टोळी सक्रिय ठेवून गुन्हेगारी घटनाही घडवून आणत होता.

आकाश नेटके | Updated: Jun 23, 2023, 03:52 PM IST
शाळेतल्या मुलांना गुन्हेगारीविश्वात ढकलणाऱ्या आरोपीला बेड्या; चुहा गँगच्या प्रमुखाला अखेर अटक title=

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्यात (Pune Crime) गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसतेय. अशातच आता पुणे पोलिसांकडून (Pune Police) गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहे. पुणे पोलिसांनी आता मोक्कामधील एका फरार असलेल्या आरोपीला अखेर बेड्या ठोकल्या आहेत. मोक्कामध्ये (MCOCA) सहा महिन्यांपासून फरार असलेला चुहा गँगच्या मुख्य आरोपीस भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. साकिब मेहबूब चौधरी ( वय 23 कात्रज ) असे आरोपीचे नाव असून गेल्या अनेक महिन्यांपासून फरार होता.

मोक्कातील आरोपी साकिब मेहबूब चौधरी हा 16 फेब्रुवारीपासून सापडत नव्हता. मात्र आता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी साकीब मेहबुब चौधरी ऊर्फ लतिफ बागवान हा गुन्हा घडल्यापासून फरार कालावधीत तो त्याचे अस्तित्व लपवून वारंवार वेगवेगळया जिल्हयांमध्ये त्याची ओळख व ठाव ठिकाण बदलून राहत होता. त्याच दरम्यान तो कात्रज आणि संतोषनगर परिसरात स्वतःच्या टोळीची दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र भारती विद्यापीठ पोलिसांनी बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणावरून त्याला ताब्यात घेतले आहे.

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी पुरंदर तालुक्यातील निरा येथे जावून आरोपी साकीब मेहबुब चौधरी ऊर्फ लतिफ बागवान याचा शोध घेतला असता तो त्यावेळी तो तिथे सापडला. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. आरोपीला या गुन्ह्याचे तपास अधिकारी स्वारगेट सहाय्यक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या ताब्यात देण्यात आले असून त्यांनी साकीबला अटक केली आहे.

आरोपी साकीब मेहबुब हा रेकॉर्डवरील आरोपी असून त्याच्यावर यापूर्वी मोक्का कायद्यांन्वये कारवाई करण्यात आली होती. त्या गुन्ह्यातून साकीबला जामीन मिळाल्यानंतर त्याने पुन्हा कात्रज भागात वर्चस्व प्रस्थापित करत त्याच्या साथीदारांनी पुन्हा त्यांची टोळी तयार करुन गुन्हा केला. आरोपी साकीब मेहबुब चौधरी टोळीचे वर्चस्व प्रस्थापीत करण्यासाठी कात्रज भागातील शाळेत जाणाऱ्या बालकांचा वापर करुन दहशत निर्माण करत होता अशीही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

दरम्यान,  कात्रज आणि परिसरात दहशत निर्माण करणार्‍या गुंडांच्या टोळीविरुद्ध पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये कारवाई केली होती. यामध्ये टोळीचा म्होरक्या साकिब मेहबूब चौधरी, रेहान सीमा शेख उर्फ रेहान दिनेश शेख, अब्दुलअली जमालउद्दीन सैय्यद, संकेत किशोर चव्हाण, ऋतिक चंद्रकांत काची यांचा समावेश होता. यापैकी रेहान शेख, अब्दुलअली सय्यद, संकेत चव्हाण, ऋतिक काची यांना अटक करण्यात आली होती. तर टोळी प्रमुख लतिफ बागवान हा फरार होता.