धावत्या कार पेटण्याच्या घटना वाढल्या, काय आहेत कारणं?

अलिकडच्या काळात धावत्या कार पेटण्याच्या घटना वाढल्या आहेत.

Updated: Dec 16, 2019, 10:06 PM IST
धावत्या कार पेटण्याच्या घटना वाढल्या, काय आहेत कारणं? title=

विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : अलिकडच्या काळात धावत्या कार पेटण्याच्या घटना वाढल्या आहेत. एवढ्य़ा मोठ्या प्रमाणात कार का पेट घेऊ लागल्या असा प्रश्न सगळ्यांना पडू लागला आहे. धावती कार किंवा एखादं वाहनं पेटणं या घटना रोजच्याच झाल्या आहेत. दिवसाआड अशी एखादी घटना तरी आपण ऐकतच असतो. अलिकडं तर बड्या कार निर्मात्या कंपन्यांच्या कार्सनाही आगी लागू लागल्या आहेत. धावत्या कार्सना आगी का लागतात. या कार कशा पेट घेतात असा प्रश्न तुम्हा आम्हाला पडला असेल. 

धावत्या कार पेटण्याला अनेक कारणं आहेत. कारमधील इंधनाची गळती झाल्यास कारला आग लागण्याची शक्यता असते. उंदरांकडून कारमधील वायर कुरतडल्या जातात. या वायर्समध्ये शॉर्ट सर्किट झाल्यास कारमध्ये आग लागते. इंजिन मर्यादेपेक्षा जास्त गरम झाल्यासही आग लागते. कधी कधी तर टायर अतिगरम होऊन पेट घेतात आणि कारला आग लागते. कार सजवताना नवीन वायरिंग टाकल्यानं आगीच्या घटना वाढल्या आहेत. 

आपली कार संभाव्य आगीपासून सुरक्षित ठेवायची झाल्यास काही उपाययोजना करणं गरजेचं आहे. वाहनाची नियमित देखभाल ठेवायला हवी. कारमधील यंत्रणा उंदरांपासून सुरक्षित ठेवावी. कार जास्त तापत नाही ना याकडं लक्षं ठेवावं. कार ठराविक अंतर चालल्यानंतर इंजिन बंद करणे. ड्युप्लिकेट पार्ट्स वापरु नयेत. कंपनीच्या अधिकृत डिलरकडूनच कारची दुरुस्ती आणि सर्व्हिसिंग करणे. या गोष्टी पाळल्यास कार सुरक्षित राहते. शिवाय प्रवासही सुरक्षित होतो.

आधीच रस्ते अपघातांची संख्या चिंताजनक पद्धतीनं वाढतेय. त्यात कार जळत्या शवपेट्या बनू नये यासाठी काळजी घ्यावी. नाहीतर कारमधील तुमचा प्रवास अधिक बेभरवशी होईल यात शंका नाही.