Mumbai Diamond Market : मुंबई आणि महाराष्ट्रातले उद्योग गुजरात पळवतंय असा आरोप वारंवार होत असतो, अनेक केंद्रीय संस्थांची ऑफिसेस मुंबईहून गुजरातला हलवण्यात आली असाही आरोप होत असतो. त्यात आता मुंबईतील तब्बल 17 हजार कोटी रुपयांचा हिरे व्यापार सुरतला स्थलांतरित झालाय. सुरतला सुरत डायमंड बोर्स नावाचं जगातलं सर्वात मोठं डायमंड हब उभारण्यात आला आहे. हजारो कोटींचा हिरे बाजार गुजरातला गेल्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्राचं नेमकं किती नुकसान होणार आहे. हिरे व्यापारांनी महाराष्ट्रातून गुजरातला स्थलांतर का केलंय? जाणून घेवूया.
मुंबईतून हिरे व्यापा-यांचं स्थलांतर का?
वर्षानुवर्षे सूरत शहराला डायमंड सिटी म्हटले जाते. सूरत शहरातील हिरे कारखान्यांमध्ये बनवलेले हिरे देशातील आणि जगातील विविध देशांमध्ये निर्यात केले जातात. सूरतच्या हिरे कारखान्यांमध्ये तयार करण्यात आलेले हिरे जगातील विविध देशांमध्ये पाठवण्यासाठी मुंबईचा वापर केला जातो. मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळ असल्यामुळे सूरतच्या हिरे व्यापाऱ्यांना मुंबईत स्वतंत्र कार्यालय सुरू करावे लागले. परंतु आता असे होणार नाही, कारण सूरत डायमंड बोर्स ही जगातील सर्वात मोठी डायमंड हब इमारत गुजरातमधील सूरत येथे बांधण्यात आली आहे, ज्यामध्ये सूरतच्या हिरे व्यापाऱ्यांना आवश्यक असलेल्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
सूरत डायमंड बोर्स अंदाजे 3400 कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आले आहे. 67 लाख चौरस फूट जागेवर 14 मजल्यांचे 9 टॉवर्स आहेत. टॉवर्समध्ये विविध हिरे कंपन्यांची 4300 कार्यालये आहेत. सुरत आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे जगभरात हि-यांची निर्यात करता येतेय, त्यामुळे हिरे व्यापा-याला तेजी मिळाली.
दरम्यान आयतं कोलीत मिळाल्यामुळे विरोधक या मुद्द्यावरुन तुटून पडले आहेत. तर विरोधकांच्या टीकेला उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही प्रत्युत्तर दिलंय. नवी मुंबईत देशातलं सर्वात मोठं डायमंड क्लस्टर बनवत आहोत असं उदय सामंतांनी म्हटल आहे. व्यावसायिकांना मुंबईत स्वतंत्र कार्यालयीन कर्मचारी ठेवावे लागत होते, कार्यालय उघडावे लागत होते आणि आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे त्यांना मुंबईतूनच व्यवसाय करावा लागत होता. पण आता सूरत डायमंड बोर्समध्ये हिरे व्यापाऱ्याला आवश्यक असलेल्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत.
सूरत डायमंड बाजार उघडल्यानंतर मुंबईतील हिरे व्यवसायाशी संबंधित सुमारे 1000 कार्यालयं कायमची बंद होतील. त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्र सरकारचं कोट्यवधी रुपयांच्या कराचं नुकसान होणार आहे. हजारो रोजगारही गुजरातला जाणार आहेत. गुजराती व्यापा-यांसह गुजरात सरकारनं मुंबई-महाराष्ट्राला दिलेला हा मोठा धक्का मानला जात आहे.