राणेंना लटकावल्यानंतर भाजप आता 'राणां'च्या मागे!

एकीकडे 'आपल्याला भाजपकडून राज्यसभेची खासदारी स्वीकारण्याची ऑफर' असल्याचं सांगत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी एकच खळबळ उडवून दिलीय... तर दुसरीकडे आता भाजप प्रसिद्ध अभिनेत्री व आमदार रवि राणा यांच्या पत्नी नवनीत राणा यांनाही पक्षात समाविष्ट करून घेण्यासाठी हालचाल करत असल्याचं समोर येतंय.

Updated: Mar 1, 2018, 07:40 PM IST
राणेंना लटकावल्यानंतर भाजप आता 'राणां'च्या मागे! title=

अमरावती : एकीकडे 'आपल्याला भाजपकडून राज्यसभेची खासदारी स्वीकारण्याची ऑफर' असल्याचं सांगत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी एकच खळबळ उडवून दिलीय... तर दुसरीकडे आता भाजप प्रसिद्ध अभिनेत्री व आमदार रवि राणा यांच्या पत्नी नवनीत राणा यांनाही पक्षात समाविष्ट करून घेण्यासाठी हालचाल करत असल्याचं समोर येतंय.

लोकसभा निवडणूक २०१९ चे पडघम वाजायला सुरुवात झालीय. दुखावलेला मित्रपक्ष 'शिवसेना' पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपशी हातमिळवणी करणार नसल्याचं जाहीररित्या आणि ठणकावून सांगितलंय. साहजिकच या पार्श्वभूमीवर भाजपला लोकसभा निवडणुकीसाठी नवे उमेदवार शोधावे लागणार आहेत. 

अमरावती मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. भाजपकडे सध्या तरी इथं उभं राहण्याजोगा एकही उमेदवार नाही. या जागेवर भाजपकडून नवनीत राणा यांच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो. 

याआधीही, आमदार रवि राणा यांनी आपल्या पत्नीसाठी भाजपचं दार ठोठावलं होतं... पण भाजपच्या स्थानिक नेत्यांकडूनच राणांना विरोध झाल्यानं त्यांचे हे प्रयत्न फोल ठरले... आता मात्र राजकारणाची सूत्रं बदलत आहेत... राणा यांना भाजपच्या गोटातून होणारा विरोधही मावळताना दिसतोय. त्यामुळे, या जागेवरून नवनीत राणा भाजपच्या तिकीटावर उभ्या राहिल्या, तर आश्चर्य वाटायला नको.

गेल्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. त्यांना शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर मात्र राणा आणि राष्ट्रवादीचं बिनसलंय... आणि अडसूळ यांचा प्रभावही कमी होऊन उलट त्यांच्याबद्दल नाराजी वाढू लागलीय. अर्थात, याचा फायदा राणांना होणार का? आणि राणा भाजपच्या गोटात दिसणार का? या प्रश्नांची उत्तरं लवकरच मिळू शकतील.