ठाणे : ठाणे जिल्ह्यात दारु न विकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, त्यामुळे मद्यप्रेमींची पुन्हा एकदा अडचण होणार आहे. हा निर्णय ठाणे जिल्हा बार असोसिएशनने घेतला असला, लॉकडाऊनमध्ये ज्या प्रमाणे दारु मिळत नव्हती तसंच काहीसं हे चित्र असणार आहे, एकाप्रकारे ठाणे जिल्ह्यात दारुविक्रीचा १० दिवस लॉकडाऊन असणार आहे.
दारुवरील उत्पादन शुल्क तसेच इतर दारूवरील करात सवलत द्या, अशी मागणी ठाणे जिल्हा बार असोसिएशनने सरकारकडे केली आहे. यासाठी १० दिवस ठाणे जिल्ह्यात दारु विक्री न करण्याचा निर्णय ठाणे जिल्हा बार असोसिएशनने घेतला आहे. सरकारने यावर काहीही निर्णय घेतला नाही, तर दारु विक्री बंद आंदोलनाची पुढील दिशा ही १० दिवसानंतर ठरवली जाणार आहे.
लॉकडाऊनमध्ये दारुविक्री बंद झाली होती, तेव्हा मद्यप्रेमींचे खूप हाल झाले होते. घेण्यासाठी दारूच्या दुकानासमोर नंतर रांगा लागत होत्या, आता तर ठाणे जिल्ह्यात दारुविक्रीच बंद राहणार असल्याने मद्यप्रेमींचे पुन्हा एकदा हाल होणार आहेत. पण दारुविक्री न करण्याचा निर्णय हा कोरोनासोडून वेगळ्या कारणाने झाला असला, तरी लॉकडाऊन होवो न होवो, त्याआधी गर्दी कमी करण्यास मदत होणार आहे.