औषधांची फवारणी करताना सहाशेहून अधिक शेतकऱ्यांना विषबाधा

जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाचा सुस्त कारभार सुरु असल्याने पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करताना विषबाधा होऊन मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांची संख्या १८ वर पोहोचली आहे.

Updated: Oct 2, 2017, 10:39 PM IST
औषधांची फवारणी करताना सहाशेहून अधिक शेतकऱ्यांना विषबाधा title=

श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ: जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाचा सुस्त कारभार सुरु असल्याने पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करताना विषबाधा होऊन मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांची संख्या १८ वर पोहोचली आहे.

पिकांना रोगांपासून वाचविण्याची धडपड करतांना शेतकऱ्यांचे जीव जात असून बरेच शेतकरी मृत्यूशी झुंज देत आहेत. यवतमाळमध्ये जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या ३ महिन्यात पिकांवर औषधांची फवारणी करताना सहाशेच्यावर शेतकऱ्यांना विषबाधा झालीय.

१८ शेतकऱ्यांचा दुर्देवी मृत्यू झालाय तर ८ शेतकरी अजूनही गंभीर अवस्थेत आहेत. जिल्हा रुग्णालयात विषबाधा झाल्यानं खाजगी रुग्णालयात उपचार घेणा-या रुग्णांची संख्या वाढल्यानं सर्व बेड फुल्ल झालेत. विषबाधा झाल्यानं खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची आकडेवारी वेगळीच.

यवतमाळ जिल्ह्यात कपाशी आणि सोयाबीन पिकांवर किडींचं मोठ्या प्रमाणात आक्रमण झालं असून खरीप हंगाम उध्वस्त होऊ नये म्हणून किडीच्या वेळीच नियंत्रणासाठी शेतकरी कीटकनाशकांची फवारणी करतायत. मात्र, फवारणी करताना काय काळजी घेतली पाहिजे याबाबत कृषी विभागाकडून माहिती दिली जात नसल्यानं फवारणी शेतकरी शेतमजुरांच्या जीवावर बेतली आहे.

फवारणीतून विषबाधा झाल्याची कारणं शोधणं आणि उपाययोजना करण्यात प्रशासनाचा कारभार मात्र ढिम्मच आहे. पालकमंत्री आणि शेतकरी स्वावलंबन मिशनच्या अध्यक्षांनी बैठकांचे सोपस्कार आटोपले मात्र त्यातल्या सूचनांबाबत कृषी विभाग गंभीर नसल्यानं शेतक-यांचे जीवाशी खेळ सुरू आहेत.

विषबाधेमुळे मृत्यूमुखी पडलेल्या शेतक-यांच्या कुटुंबीयांनी आर्थिक मदत करावी आणि सोबतच त्यांच्या मृत्यूस जबाबदार असणा-यांना मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत अशी मागणी शेतकरी न्याय हक्क समितीचे अध्यक्ष देवानंद पवार यांनी केलीय.

कृषी विभाग, कृषी विद्यापीठं गंभीर नसल्यानंच कीटकनाशकं शेतक-यांच्या जीवावर उठलीयेत. कृषी विभागानं प्रत्यक्ष शेतक-यांना कीटकनाशक फवारणी, कीटक नाशकाचा उपयोग, खतांची मात्रा याद्वारे कीड नियंत्रणाचं मार्गदर्शन करण्याची आवश्यकता आहे. मात्र, असं न झाल्यानंच गरीब शेतकरी शेतमजूर विषबाधेचा सामना करतायत.