यवतमाळमध्ये विधानसभेसाठी आघाडी आणि युतीची जोरदार मोर्चेबांधणी

यवतमाळमध्ये कोणाची हवा... 

Updated: Sep 15, 2019, 05:20 PM IST
यवतमाळमध्ये विधानसभेसाठी आघाडी आणि युतीची जोरदार मोर्चेबांधणी  title=

श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ : लोकसभेला केंद्रात भाजपा सरकारला पुन्हा बहुमताचा कौल मिळाल्यानंतर राज्यात देखील तोच कित्ता गिरविण्याची रणनीती भाजप-शिवसेनेनं आखली आहे. तर पुन्हा सत्ता काबीज करण्याचा काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचा खटाटोप आहे. एकेकाळचा काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला यवतमाळ मात्र २०१४ च्या निवडणुकीनंतर जिल्ह्यात काँग्रेस भुईसपाट झाल्याचं चित्र आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ७ पैकी ५ मतदारसंघात भाजपचं कमळ फुललं. तर शिवसेनेचा एक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एक आमदार विजयी झाला. 

जिल्ह्यात १६ पैकी सर्वाधिक सात नगराध्यक्ष शिवसेनेचे असून भाजपाचे चार, प्रहार, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी एक, तर २ अपक्ष नगराध्यक्ष आहेत. यवतमाळ जिल्हा लोकसभेच्या तीन मतदारसंघात विभागला गेला आहे. त्यामुळं शिवसेनेच्या भावना गवळी, शिवसेनेचे हेमंत पाटील आणि काँग्रेसचे बाळू धानोरकर इथले खासदार आहेत. आता विधानसभेसाठी आघाडी आणि युती दोघांनीही जोरदार मोर्चेबांधणी केली आहे.

यवतमाळ जिल्ह्याला भाजपाचे मदन येरावार आणि अशोक उईके, शिवसेनेचे संजय राठोड आणि तानाजी सावंत यांच्या रुपानं चार मंत्रिपदं मिळालीत. यवतमाळमधून मदन येरावारांची उमेदवारी निश्चित असून, त्यांच्या विरोधात माजी नगराध्यक्ष सुभाष राय यांच्यासह अनेक नावं चर्चेत आहेत. मुख्यमंत्र्यांनी अखेरच्या मंत्रिमंडळ विस्तारात राळेगावचे भाजपा आमदार अशोक ऊईकेंना आदिवासी विकासमंत्री केल्यानं त्यांची उमेदवारी निश्चित मानली जातेय. काँग्रेसकडून माजी मंत्री वसंत पुरके ह्यांनी पुन्हा गुडघ्याला बाशिंग बांधलं आहे.

राज्याला दोन मुख्यमंत्री देणाऱ्या पुसदमधून गेल्यावेळी मनोहर नाईक हे एकमेव राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निवडून आले. यावेळी ते निवडणूक लढणार नसले तरी त्यांचे पुत्र ययाती किंवा इंद्रनील लढणार आहेत. शिवबंधन हाती बांधायचं की राष्ट्रवादीतूनच लढायचं याबाबत नाईक कुटुंबीय द्विधा मनस्थितीत आहेत. दारव्हा मतदारसंघात शिवसेनेकडून राज्यमंत्री संजय राठोड यांची उमेदवारी निश्चित असून काँग्रेस सोडून भाजपमध्ये आलेले माजी मंत्री संजय देशमुख यांनी देखील मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

वणी मतदारसंघात विद्यमान भाजप आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना नगरध्यक्ष तारेंद्र बोर्डे आणि शिवसेनेचे माजी आमदार विश्वास नांदेकर यांचं आव्हान असेल. काँग्रेसकडून माजी आमदार वामनराव कासावार आणि संजय देरकर इच्छुक आहेत. आर्णी मतदारसंघाचे विद्यमान भाजपा आमदार राजू तोडसाम यांची कारकीर्द वादग्रस्त ठरल्यानं माजी आमदार संदीप धुर्वे यांनी उमेदवारीची मागणी केली आहे. 

काँग्रेसकडून माजी मंत्री शिवाजी मोघे पुन्हा इच्छुक असले तरी मनोहर मसराम या शासकीय सेवेतील अभियंत्याला निवडणुकीत उतरविण्याची रणनीती मोघे विरोधकांनी आखली आहे. उमरखेड मतदारसंघात भाजपा आमदार राजेंद्र नजरधने यांच्या विरोधात नगराध्यक्ष नामदेव ससाणे यांचं नाव पुढं करण्यात आलंय. काँग्रेसकडून माजी आमदार विजय खडसे तर शिवसेनेकडून डॉ. विश्वनाथ विनकरे इच्छुक आहेत.

यवतमाळ जिल्ह्यात भाजप शिवसेनेची स्थिती मजबूत असली तरी ठिकठिकाणी असलेली गटबाजी भाजपला मारक ठरू शकते. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीत संघटनात्मक बांधणी मजबूत नाही. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अजून निश्चित झालेले नाहीत. पण ते उभे राहिल्यास आघाडीला विजयापासून वंचित राहावं लागेल, एवढं नक्की...