पुणे : पुण्यातल्या येरवडा मध्यवर्ती कारागृहामधलं शनिवार सकाळचं वातावरण एरवीच्या दिवसांपेक्षा वेगळं पाहायला मिळालं. कारण येरवडा कारागृहात सुप्रसिद्ध तालवादक शिवमणी यांचा खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
निमित्त होतं ते प्रेरणापथ या कार्यक्रमाचं. यावेळी शिवमणी यांनी मंचावरुन आपली कला सादर करुन सगळ्यांना ताल धरायला लावला.
सोबतच कैद्यांमध्ये जाऊन त्यांनाही आपल्या वादनात सहभागी करुन घेतलं. मराठी, पंजाबी, दाक्षिणात्य शैलीमधल्या संगीतातल्या त्यांनी केलेल्या वादनानं, कैदीच नाही तर उपस्थित पोलीस अधिकारी आणि कर्मचारीही भारावून गेले.
आपल्याला लाभलेल्या देणगीचं सादरीकरण कैद्यांसमोर सादर करताना वेगळाच आनंद मिळाल्याची भावना शिवमणी यांनी यावेळी व्यक्त केली.
मनोरंजना बरोबरच कैद्यांमधल्या कलात्मक बाबींना प्रोत्साहन मिळावं यासाठी येरवडा मध्यवर्ती कारागृह, भोई प्रतिष्ठान आणि आदर्श मंडळ यांच्या वतीनं प्रेरणापथ हा उपक्रम राबवण्यात आला.