Lockdown : एकविरा देवीचा गड कचरामुक्त

सरकारने संचारबंदी जाहीर केल्यानंतर.... 

Updated: Apr 23, 2020, 07:56 PM IST
Lockdown : एकविरा देवीचा गड कचरामुक्त  title=
संग्रहित छायाचित्र

देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, लोणावळा : कोरोना विषाणूचा झपाट्याने वाढणारा संसर्ग पाहता वेळीच महाराष्ट्रात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. संपूर्ण देशातही सध्याच्या घडीला लॉकडाऊन घोषित करण्यात आला असून बहुतांश सर्वच व्यवहार ठप्प आहेत. अगदी देवदर्शनही. कोरोनामुळे देऊळ बंदची ही परिस्थिती उदभवली खरी. पण, त्यातही आता काही सकारात्मक बदल घडून येत असल्याचं पाहायला मिळत आहे. एकिकडे लॉकडाऊननमुळे प्रदुषणाच्या पातळीत लक्षणीय घट झालेली असतानाच दुसरीकडे कार्ला येथे असणाऱ्या आई एकविरा देवी देवस्थानचा गड कचरामुक्त झाला आहे. 

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने संचारबंदी जाहीर केल्यानंतर ३१ मार्च रोजीचा पालखी सोहळाही रद्द करण्यात आला होता. अवघ्या चार ते पाच जणांच्या उपस्थितीत ही प्रथा पार पडली. याच दिवसापासून गावातील काही तरूणांनी श्री एकविरा देवस्थान कचरा मुक्त करण्याचा संकल्प केला. 

जवळपास चोवीस तरुणांनी सकाळी साडेसहा ते दहा या वेळेत स्वेच्छेने या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. यादरम्यान, त्यांनी स्वतःला आणि स्वत:मुळे इतरांना  कोरोनाचा संसर्ग होणार नाही याची काळजी घेतली. 

चाळीस ते पन्नास ट्रक कचरा गोळा करुन त्यांनी तो जाळला. जाळण्यात आलेल्या या कचऱ्यामध्ये दोन ट्रक भरतील इतक्या संख्येत फक्त दारुच्या रिकाम्या बाटल्या सापडल्या. फुटलेल्या बाटल्यांच्या काचराही या तरुणांनी गोळा करण्यास सुरुवात केली. पण, काचांमुळे अनेकांना हाताला जखमा झाल्याने फुटलेल्या बाटल्या आम्ही न उचलण्याचा निर्णय त्यांनी घेतला. फुटलेल्या बाटल्यांच्या काचा जमा केल्या असत्या तर साधारण चार ते पाच ट्रक कचरा गोळा झाला असता अशी माहिती त्यांनी दिली. शिवाय येत्या काळात या फुटलेल्या काचा उचलण्यासाठीही लॉकडाऊनंतर नक्कीच आम्ही त्यासाठी वेगळी मोहीम राबवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. 

 

आगरी- कोळी समुदायासह संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक भाविक दरवर्षी एकविरा देवीच्या दर्शनासाठी जातात. अशा वेळी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी गड स्वच्छ कसा राहिल याचीच काळजी घेणं अतिशय महत्त्वाचं असल्याची बाब समोर येत आहे. मंदिर प्रशासन आणि स्थानिकांकडून गडाचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठीचे हे प्रयत्न दीर्घकाळ टीकतील असेच असावेत अशीच अपेक्षा करण्यात येत आहे.