नितेश महाजन, झी मीडिया, जालना: शहरी भागासह ग्रामीण भागातील तरुणांना देखील मोबाईल गेमचे वेड लागले आहे. ऑनलाईन गेमच्या नादात तरुणाने गमावले तब्बल 40 लाख रुपये गमावले आहेत (Online Game). यामुळे हा तरुणावर उपासमारीची वेळ आली आहे. तर माॅस्ट बेट नावाच्या गेममध्ये तरुणाला शेत जमीन देखील विकावी लागली आहे. जालना (Jalana) जिल्ह्यातील ढगी गावातील अनेक तरुण या ऑनलाईन गेमच्या आहारी गेले आहेत.
सध्या अनेकांना मोबाईलमध्ये ऑनलाईन जुगार खेळण्याचा नाद लागला आहे. ऑनलाईन जुगाराला बळी पडून अनेक तरुण सर्वस्व गमावून बसत आहेत. असाच काहीसा प्रकार जालना जिल्ह्यात घडला आहे. एका तरुणाला ऑनलाईन गेममुळं तब्बल 40 लाख रुपये गमवावे लागले आहेत. त्यामुळे उदरनिर्वाहासाठी आज या तरुणाला गावात पानटपरी चालवण्याची वेळ आली आहे. जालना जिल्ह्यातील ढगी गावात हा प्रकार घडला आहे. परमेश्वर केंद्रे असं या तरुणाचं नाव आहे. परमेश्वरला ऑनलाईन गेमचा नाद लागला. यामुळे त्याला शेत जमीनही विकावी लागली आहे.
परमेश्वरला मागच्या एक वर्षांपासून माॅस्ट बेट नावाचा गेम खेळण्याची सवय लागली. सुरुवातीला त्याने शंभर, एक हजार रुपयांनी हा गेम खेळला. यामध्ये त्याला बऱ्यापैकी पैसेही मिळाले. त्यानंतर तो हजारो रुपये यामध्ये गुंतवून हा गेम खेळू लागला. बघता बघता यामध्ये शेत जमीनही विकावी लागली असून वर्षभरात त्यानं तब्बल 40 लाख रुपये गमावले आहेत. फसवणूक झाल्याचं लक्षात येताच या तरुणानं थेट पोलिसात धाव घेतली. मात्र, गुन्हा दाखल करून न घेता सायबर पोलिसांनी त्याला बँक स्टेटमेंट आणण्याचा सल्ला दिला.
इतकच काय तर या छोट्याशा गावात तीस ते चाळीस मुलं या गेमला बळी पडले आहेत. येथील तरुण वेगवेगळ्या पद्धतीचे ऑनलाईन गेम खेळतात. यामध्ये अनेकांचे पैसेही गेले आहेत. माॅस्ट बेट हा गेम परदेशातल्या एका कंपनीनं तयार केला आहे. या गेमवर भारतात बंदी आहे. भरातात या गेम खेळण्यास परवानगी नसल्यामुळे हा गेम प्ले स्टोअरवर उपलब्ध नाही. ऑनलाईन लिंकद्वारे हे गेम डाऊनलोड केला जातो. यामध्ये गेमिंगचे अनेक प्रकार आहेत. सुरुवातीला हा आपल्याला बोनसचं अमिष दाखवून गेम खेळण्यास भाग पाडतो. बोनस स्वरुपात मिळणाऱ्या पैशांच्या अमिशाला बळी पडून अनेक तरुण या गेममध्ये पैसे लावतात. या गेममुळे अनेकांना लाखो रुपयांचा गंडा बसला आहे.