'असे प्रसंग टिपण्याची संधी पुन्हा देऊ नको'

कोल्हापूरच्या महापुराची भीषणता जगासमोर मांडणारा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर 'त्या' व्हिडिओ जर्नालिस्टची प्रतिक्रिया 

'असे प्रसंग टिपण्याची संधी पुन्हा देऊ नको' title=

मुंबई :  वृत्तवाहिनीत काम करत असताना घडणाऱ्या घटनेची  इतंभूत माहिती सामान्य जनतेसमोर पोहोचवण्याची जबाबदारी ही प्रत्येक पत्रकाराची असते. हे काम करत असताना अनेकदा डोळ्यासमोर वेगवेगळ्या घटना घडत असतात. त्या प्रत्येक घटनेचा मनावर एक परिणाम होत असतो. पण त्यामागील भावना दाबून ती बातमी जगासमोर मांडायची ही एकच भावना प्रत्येक पत्रकाराच्या मनात असते. असेच एक वृत्त झी चोवीस तासचे व्हिडिओ जर्नलिस्ट मिथुन राजाध्यक्ष यांनी आपल्या कॅमेऱ्यात टिपलं. 

ते वृत्त म्हणजे कोल्हापुरात आलेल्या महापुराचं. कोल्हापुरातील आंबेवाडीच्या पूरग्रस्त गावात महापुराने होत्याचं नव्हतं केलं. येथील गावकऱ्यांना बचावपथकाने बाहेर काढलं.  त्यावेळी मृत्यूच्या दाढेतून बाहेर आलेल्या आंबेवाडीच्या पूरग्रस्त सुजाता आंबी यांनी जवानांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली. ते जवान म्हणजे देवदूतच या भावनेने त्यांनी त्यांच्या पायांना स्पर्श केला. हा क्षण झी चोवीस तासचे व्हिडिओ जर्नलिस्ट मिथुन राजाध्यक्ष यांनी आपल्या कॅमेऱ्यात टिपला.

'अनेकांनी सोशल मीडियाद्वारे कौतुक केले आणि याच व्हिडिओमुळे मला कोल्हापूर प्रेस क्लबचा उत्कृष्ट कॅमेरामन हा पुरस्कार जाहीर झाला आहे परंतु आजही मी सांगू इच्छितो की मी माझं काम केलं आणि आपण दिलेल्या प्रोत्साहनाने यापुढेही करत राहीन. पण असे प्रसंग टिपण्याची संधी पुन्हा देवू नको अशी प्रार्थना मी देवाकडे करत आहे', अशी भावना मिथुन यांनी व्यक्त केली आहे. (व्हायरल व्हिडीओतल्या सुजाता आंबी म्हणतात, म्हणून मला आर्मीवाल्यांमध्ये देव दिसला...!)

 त्यानंतर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. अगदी लष्कराच्या अधिकृत ट्विटर हँडलसहित भारतात तसेच भारताबाहेरील अनेक महत्त्वाच्या लोकांनी तो व्हिडिओ शेअर केला. या कामाची पोचपावती म्हणून कोल्हापुर प्रेस क्लबच्या वतीने उत्कृष्ट कॅमेरामन म्हणून मिथुन राजाध्यक्ष यांचं कौतुक करण्यात आलं. पण तो क्षण टिपत असताना मिथुन राजाध्यक्ष यांची काय भावना होती हे त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून शेअर केली आहे. 

मिथुन यांनी टिपलेल्या या क्षणाने कोल्हापुरातील महापुराची दाहकता जगासमोर मांडली. त्या पुरात अडकलेल्या प्रत्येकाची भावना सगळ्यांसमोर आली. यानंतर सुजाता आंबी या महिलेशी पुन्हा झी चोवीस तासने संवाद साधला तेव्हा त्यांनी त्या जवानात देव दिसल्याची भावना व्यक्त केली होती. ज्याप्रमाणे संत गाडगेबाबा यांनी म्हणायचे,'देव दगडात नसून माणसात आहे' याची जाणीव झाली. (आणि 'सुजाता आंबी' पूरग्रस्तांच्या वेदना सांगणाऱ्या 'चेहरा' ठरल्या) 

मिथुन राजाध्यक्ष यांची फेसबुक पोस्ट

कोणत्याही आपत्तीच्या बातम्या पाहत असताना अनेक मनं सुन्न करणारी चित्रणे आपल्यासमोर येत असतात. अशा चित्रणांमधुन त्या आपत्तीची वास्तव स्थिति परिणामकारकपणे आपल्यासमोर येत असते. याने लोकांच्या संवेदनशील मनाला जाग येवून तो मुद्दा सार्वजनिक पातळीवर चर्चिला जातो व त्यावर उपायोजना केली जाते. यादरम्यान कधीकधी एखादा व्हिडिओ किंवा एखादे छायाचित्र त्या आपत्तीची ओळख बनून जाते आणि तो प्रसंग टिपणाऱ्या छायाचित्रकाराची वाहवा होते. परंतु तो प्रसंग टिपत असताना आपली संवेदनशीलता दाबून तो प्रसंग टिपलेला असतो तेव्हा वाहवा मिळावी असा उद्देश त्या छायाचित्रकाराचा कधीच नसतो.

एलन कुर्दी या सिरीयन निर्वासित बालकाचे छायाचित्र टिपणाऱ्या तुर्किश पत्रकार निलोफर जमीर तसेच भोपाळ वायु दुर्घटनेचे छायाचित्रण करणाऱ्या रघू राय यासारख्या छायाचित्रकारांना नंतर वाहवा मिळाली असली तरी त्यांची त्यानंतर जी अवस्था झाली असेल तशीच थोडीफार माझी झाली आहे.

कोल्हापूर जिल्ह्याला गतवर्षी महापुराने दिलेल्या फटक्यात प्रचंड नुकसानीला सामोर जावं लागलं. चारही बाजूंनी बातम्या खुणावत होत्या. जमेल त्या प्रकारे लोकांना मदत कशी पोहोचेल या उद्देशाने आम्ही सर्व पत्रकार,कॅमेरामन,फोटोग्राफर प्रशासनाला सहकार्य करत रिपोर्टिंग करत होतो. यामध्ये बचावकार्यात सहभागी असणाऱ्या जवानांची भूमिका अतिशय महत्वपूर्ण होती. चारी बाजूंनी पाण्याने वेढलेल्या आणि डोळ्यासमोर होत्याच नव्हतं झालेल्या लोकांची अवस्था आजही आठवली तर अंगावर काटा येतो. मी माझ्या पत्रकारितेतील कारकिर्दीत अनेक आपत्तीचे प्रसंग कव्हर् केले तसाच हाही एक प्रसंग होता आणि तसेच मी माझे कर्तव्य करत होतो. यातील एका रिपोर्टमधील बचाव करणाऱ्या लष्कराच्या जवानाच्या पाया पडतानाचा एका महिलेचा मी चित्रित केलेला व्हिडिओ त्याकाळात प्रचंड व्हायरल झाला. अगदी लष्कराच्या अधिकृत ट्विटर हँडलसहित भारतात तसेच भारताबाहेरील अनेक महत्त्वाच्या लोकांनी तो शेअर केला आणि त्यानंतर मला कौतुक करणारे मेसेज,फोन,भेटी सुरु झाल्या. अनेकांनी सोशल मीडियाद्वारे कौतुक केले आणि आज याच व्हिडिओला मला कोल्हापूर प्रेस क्लब चा उत्कृष्ट कॅमेरामन हा पुरस्कार जाहीर झाला आहे परंतु आजही मी सांगू इच्छितो की मी माझं काम केलं आणि आपण दिलेल्या प्रोत्साहनाने यापुढेही करत राहीन.

असे प्रसंग टिपण्याची संधी पुन्हा देवू नको अशी प्रार्थना मी देवाकडे करत आपणा सर्वांचे आणि कोल्हापूर प्रेस क्लबचे,माध्यमातील विविध संपादक,पत्रकार,फोटोग्राफर विशेष करून झी 24 तास(झी मीडिया) आणि झी 24 तास मधील माझे सर्व वरिष्ठ,माझे सर्व सहकारी कॅमेरामन या सर्वांचे आभार मानतो. हा पुरस्कार मी पुरग्रस्ताना आणि जवानांना अर्पण करतो. धन्यवाद