Baba Siddiqui Murder: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दिकी (Baba Siddiqui) यांच्या हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. दरम्यान या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिष्णोई (Lawrence Bishnoi) गँगने घेतली आहे. लॉरेन्स बिष्णोई सध्या गुजरातच्या साबरमती जेलमध्ये बंद आहे. सलमान खान आणि दाऊदला मदत करणाऱ्या प्रत्येकाचा हिशोब केला जाईल अशी धमकीच लॉरेन्स बिष्णोईने दिली आहे. सलमान खानचे निकटवर्तीय असल्याने बाबा सिद्दिकींची हत्या झाली असावी असा पोलिसांना संशय आहे. दरम्यान वडिलांच्या हत्येनंतर झिशान सिद्दिकी (Zeeshan Siddique ) यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यावेळी त्यांनी आपल्या वडिलांच्या मृत्यूचं राजकारण होऊ नये अशी आशा व्यक्त केली आहे. तसंच न्याय मिळावा अशी मागणी केली आहे.
"माझ्या वडिलांनी गरीब, निष्पाप लोकांचे जीवन आणि घरांचे संरक्षण, बचाव करताना आपला जीव गमावला. आज माझे कुटुंब तुटलं आहे, परंतु त्यांच्या मृत्यूचे राजकारण केले जाऊ नये. त्यांचा मृत्यू नक्कीच व्यर्थ जाऊ नये. मला आणि माझ्या कुटुंबाला न्याय मिळावा," असं झिशान सिद्दिकी यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
My father lost his life protecting and saving the lives and homes of poor innocent people. Today, my family is broken but his death must not be politicised and definitely not go in vain.
I NEED JUSTICE, MY FAMILY NEEDS JUSTICE!— Zeeshan Siddique (@zeeshan_iyc) October 17, 2024
'झूम'ला दिलेल्या मुलाखतीत अरबाज खानने कुटुंब सध्या चिंतेत असल्याचं सांगितलं आहे. तसंच सलमान खान आपले चित्रपट पूर्ण करण्यास कटिबद्ध असल्याचंही सांगितलं. तो म्हणाला की "आम्ही सध्या ठीक आहोत. मी असं म्हणणार नाही की आम्ही एकदम बरे आहोत, कारण कुटुंबात बरंच काही घडत आहे. नक्कीच प्रत्येकजण चिंतेत आहे. मी माझा चित्रपट बंदा सिंग चौधरीचं प्रमोशन करण्यास कटिबद्ध आहे. 25 ऑक्टोबरला माझा हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट वेळेत रिलीज होईल याची मी काळजी घेत आहे. अनेक गोष्टी घडत असताना मला जे करणं भाग आहे ते करावं लागेल".
सलमान खानच्या सुरक्षेबाबात बोलताना त्याने संपूर्ण कुटुंब त्याच्या सुरक्षेसाठी मेहनत घेत असल्याची माहिती दिली. "आम्ही अतिशय व्यवस्थित आहोत असं मी म्हणणार नाही. पण जे सर्वोत्तम आहे ते करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही खात्री करुन घेत आहोत की, सरकार आणि पोलिसांसह प्रत्येकजण गोष्टी ज्याप्रकारे ठरल्या आहेत तशाच व्हाव्यात आणि सलमानची सुरक्षा व्हावी. प्रत्येकजण आपलं सर्वोत्तम देत आहे. आम्ही गोष्टी अशाच प्रकारे राहतीत हे पाहत आहोत," अशी माहिती अरबाज खानने दिली आहे.