जालना : शहरातील शिवराज नारियलवाले यांना जालन्यातील दीपक हॉस्पिटलमध्ये झालेल्या अमानूष, रानटी मारहाणीचा व्हीडिओ काल समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाला होता. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकासह पोलिस कर्मचारी सोमनाथ लहानगे, नंदकिशोर ढाकणे, सुमित सोळंके, महेंद्र भारसाकळे यांनी निलंबित करण्यात आले आहे. जालना पोलीस अधिक्षक यांनी ही कारवाई केली आहे.
शिवराज नारियलवाले हे 9 एप्रिल रोजी दीपक हॉस्पिटलमध्ये आपल्या बहिणीला उपचारासाठी घेऊन गेले होते. त्याचसुमारास गवळी समाजाचा एका युवकाचा अपघाती मृत्यू तेथे झाला आणि त्यामुळे तेथे काही लोक तेथे धुडघूस घालत होते. त्यावेळी तेथे उपस्थित काही पोलीस हे अतिशय अर्वाच्य शब्दात शिविगाळ करीत असल्याने शिवराज नारियलवाले यांनी पोलिसांची ही शिविगाळ आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केली.
व्हीडिओ काढल्याच्या रागातून पण, त्यांना त्याची जी जबर शिक्षा उपस्थित पोलिसांनी दिली, ते या व्हीडिओतून दिसून येते. गणवेशातील 6 आणि गणवेशात नसलेले 2 असे आठ पोलिस त्यांना घेरून अमानूष मारहाण करीत होते. अगदी डोक्यावर सुद्धा मारहाण करण्यात आली. असे व्हायरल व्हीडिओत स्पष्ट दिसत आहे.
याप्रकरणी आता जालना पोलीस अधिक्षक यांनी संबधितांवर निलंबनाची कारवाई केली आहे.