मुंबई : फॅण्ड्री, ख्वाडा अशा सिनेमातून ग्रामीण भागातील नागरिकांचे भावनाविश्व मांडण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर आता घुमा हा मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. नुकताच या सिनेमाचा प्रोमो समोर आला आहे. त्यामुळे सर्वांना चित्रपटाविषयची उत्सुकता लागून राहिली आहे. महेश रावसाहेब काळे हा तरुण एका भावपूर्ण सिनेमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करीत आहे. हा मराठी चित्रपट येत्या ६ ऑक्टोबर २०१७ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
आपल्या मुलीला इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्यासाठी धडपडणाऱ्या एका शेतकऱ्याची कथा ‘घुमा’ या चित्रपटातून मांडण्यात आली आहे. या चित्रपटात गुरु ठाकूर यांनी शब्दबद्ध केलेली तीन गाणी असून त्याचे संगीत जसराज जोशी, ऋषिकेश दातार आणि सौरभ भालेराव यांनी केले आहे. त्यामुळे सिनेमातील गाणीदेखील श्रवणीय असतील याची प्रेक्षकांना खात्री आहे. या गाण्यांना अजय गोगावले, प्रिया बर्वे आणि मुग्धा हसबनीस यांचे स्वर लाभले असून त्याचे नृत्यदिग्दर्शन फुलवा खामकर यांनी केले आहे.
चित्रपटाचे छायाचित्रण योगेश कोळी यांनी केले असून संकलन अपूर्वा साठे यांनी केले आहे.
“ढोलकीच्या तालावर” या प्रसिद्ध मालिकेची विजेती वैशाली जाधव हिने ‘घुमा’ या चित्रपटात एक लावणी सादर केली आहे. नवीन कलाकार असून त्यांची निवड महेशने संभाजीनगर आणि नगर येथे ऑडिशन आयोजित करून केली. चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण नगरच्या ग्रामीण भागात २५ दिवसांत पूर्ण करण्यात आलं आहे.