Maharashtra Board HSC Exam Paper Leak: राज्यामध्ये सुरु असलेल्या उच्च माध्यमिक परीक्षेचा (12th HSC Maharashtra Board) गणिताचा पेपर आज सकाळी 11 वाजता सुरु होण्याआधीच फुटला. 11 वाजता पेपर सुरु होण्याच्या अर्धा तास आधी म्हणजे 10 वाजून 30 मिनिटांनीच गणिताचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. बुलढाण्यामध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला असून याचे पडसाद थेट विधीमंडळामध्येही उमटले. विरोधीपक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधीमंडळामध्ये थेट 'झी 24 तास'च्या (Zee 24 Tass) बातमीची क्लिप दाखवत सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. अजित पवारांनी या पेपरफुटीसंदर्भात संताप व्यक्त करताना, सरकार झोपलेलं आहे का असा प्रश्न विचारला. तसेच राज्याच्या माजी शिक्षणंत्री वर्षा गायकवाड यांनी वारंवार असे प्रकार घडत असल्याचं नमूद करत 10 मिनिटंआधी पेपर द्यायचा नाही असा नव्या सरकारने नियम बनवला असताना अर्धा तास आधी पेपर फुटलाच कसा असा प्रश्न उपस्थित केला आहे.
12 वीचा गणिताचा पेपर फुटल्याची बातमी सर्वात आधी 'झी 24 तास'ने दाखवल्यानंतर अजित पवारांनी विधानसभेमध्ये थेट या बातमीची क्लिपच मोबाईलवर प्ले करत सत्ताधारी शिंदे सरकारला जाब विचारला. "पेपर फुटला आहे. साडेदहाला फुटला आहे पेपर. परीक्षा सुरु होण्याआधीच फुटलाय. हे कसं काय चलणार? सरकार काय करतंय मला कळत नाही. झोपलंय का काय? पुन्हा बोलल्यावर वाटतं की दादा बोलतात दादा बोलतात. हे 12 वीच्या मुलांचं नुकसान आहे. मध्ये पण एका पेपरचं असंच झालं," असं म्हणत अजित पवारांनी हा विषय विधानसभेमध्ये उपस्थित केला.
शिक्षणमंत्री दिपक केसरकर सभागृहामध्ये उपस्थित नसल्याने राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सरकारच्यावतीने भूमिका स्पष्ट केली. "विरोधीपक्ष नेत्यांनी उपस्थित केलेला प्रश्न गंभीर आहे. काही विशिष्ट भागांमध्ये हे कॉपीचं रॅकेट मागील काही वर्षांपासून सुरु आहे. राज्य सरकारने कॉपीमुक्त अभियान या परीक्षेच्यानिमित्ताने सुरु केलं होतं. भरारी पथक नेमकं, आवश्यक ती परीक्षा केंद्र ओळखून त्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांची नेमणूक करणं. तरी त्या ठिकाणी पेपर सुरु होण्यापूर्वी फुटला आहे ही बाब गंभीर आहे. तात्काळ याबाबद चौकशी करण्याची सूचना देऊ. त्यासंदर्भात या विभागाचे मंत्र्यांशी चर्चा करुन आज संध्याकाळपर्यंत निवेदन करण्याचा प्रयत्न करु," असं विखे-पाटील म्हणाले.
यानंतर माजी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी या विषयावर भाष्य करताना नवे नियम बनवलेले असतानाही पेपर फुटला कसा असा प्रश्न उपस्थित केला आहे. "12 वीचा इंग्रजीचा पेपर होता त्यात 2-2 मार्काचे 3 प्रश्न चुकीचे होते. म्हणजे 6 मार्कांचे प्रश्न चुकलेले. हिंदीचा पेपर आला. तिसरा मराठीऐवजी इंग्रजीचा पेपर गेला. आज ही बुलढाण्याची तिसरी घटना आहे. सन्माननिय सदस्य तुम्ही मला सांगाताय चौकशी करु पण आपण निर्णय घेतला त्यावेळी सांगितलं की 10 मिनिटं आधी पेपर द्यायचा नाही कारण तो बाहेर जातो. भरारी पथक काढले, सगळं केलं. मोबाईला परवानगी नाहीय. नव्या सरकारने 10 मिनिटं आधी पेपर द्यायचा नाही असा निर्णय घेतला मग अध्यक्ष मोहोदय अर्धा तास आधी हा पेपर बाहेर गेला कसा? हा खूप मूलभूत प्रश्न आहे," असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.
"हे पहिल्यांदा झालेलं नाही. बीडमध्ये झालं आहे. मराठीच्या, इंग्रजीच्या पेपरबद्दल झालं आहे. त्यामुळे कुठे ना कुठे आपल्याला एचएससी बोर्ड आहे त्यांना सांगावं लागेल. कारण प्रत्येक वेळी असं होतं. 12 वीचं वर्ष हे विद्यार्थ्यांसाठी माईलस्टोन असतो. त्यांनी मेहनत घेतलेली असते. त्यामुळे माझी विनंती आहे की यासंदर्भात योग्य ती कारवाई करावी," अशी मागणी वर्षा गायकवाड यांनी केली.