Surat Diamond Bourse : गेल्या काही काळापासून महाराष्ट्रातले उद्योग इतर राज्यांमध्ये जाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. यावरुन विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात काही महिन्यांपूर्वी चांगलीच जुंपली होती. एकमेकांवर आरोपप्रत्यारोप झाले पण उद्योगाबाबत कोणीच ठोस भूमिका घेताना दिसत नाहीये. अशातच आता देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईलाही मोठा झटका बसला आहे. मुंबईत (Mumbai) स्थायिक झालेल्या गुजराती हिरे व्यापाऱ्यांनी (Diamond Business) आपला इथला व्यवसाय बंद करून सूरतच्या दिशेने स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. सूरतच्या हिरे व्यापाऱ्यांनी 3400 कोटी रुपये खर्च करून जगातील सर्वात मोठे हिरे व्यवसाय केंद्र (SDB) गुजरातमध्ये (Gujarat) तयार केलं आहे. तिथेच या व्यापाऱ्यांनी आपला व्यवसाय सुरु करण्याचे ठरवलं आहे. त्यामुळे आता मुंबईला मोठा धक्का बसला आहे.
डिसेंबरमध्ये सूरत डायमंड बाजार सुरू होणार असून, सुरत हे देशाचे प्रमुख हिरे व्यापार केंद्र म्हणून मुंबईला मागे टाकण्यासाठी तयार झालं आहे. सूरतच्या हिरे व्यापाऱ्यांनी हजारो कोटी रुपये खर्च करून जगातील सर्वात मोठे हिरे व्यवसाय केंद्र तयार केले आहे. सूरत डायमंड बुर्स (Surat Diamond Bourse) नावाच्या या डायमंड हबला जगातील सर्वात मोठ्या इमारतीचा खिताबसुद्धा बहाल करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईतील हिरे व्यापारी गुजरातच्या सुरत डायमंड बोर्समध्ये तळ हलवण्याचा विचार करत आहेत. सरकारी मदतीशिवाय 3,400 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या बाजारासह, सुरतचे उद्दिष्ट मुंबईला देशाचे हिरे व्यापार केंद्र म्हणून बदलण्याचे आहे. त्यामुळे मुंबईच्या हिऱ्यांच्या व्यापाराला धक्का बसण्याची शक्यता आहे.
अब्जाधीश हिरे व्यापारी वल्लभभाई लखानी, किरण जेम्सचे संचालक, यांनी आपला 17,000 कोटी रुपयांचा व्यवसाय सुरत येथे हलवला आहे. इतकंच नाही तर लखानी यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी तिथे राहण्याचीही पूर्णपणे व्यवस्था केली आहे. डायमंड कंपन्यांची जवळपास 1,000 कार्यालये मुंबईतील कामकाज संपवून स्थलांतरित होण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या कर महसुलाला मोठा फटका बसेल, असे सूरत डायमंड बाजार समितीच्या सदस्याने म्हटले आहे.
मुंबईच्या वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील भारत डायमंड बोर्स (BDB) हे जगातील सर्वात मोठे डायमंड कॉम्प्लेक्स आहे. यामध्ये 2,500 कार्यालये 2 लाख स्क्वेअर फूटमध्ये पसरलेली आहेत. आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे, हिऱ्यांची निर्यात करण्यासाठी आम्हाला मुंबईत त्यांचे कार्यालय उघडावे लागले होते, असे हिरे व्यापाऱ्यांचे म्हणणे होते. मात्र आता सूरत डायमंड बुर्स डायमंड हबमध्ये हिरे व्यापाऱ्यांना आवश्यक असलेल्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळेच आता मुंबईतून जगभरात हिऱ्यांचा व्यवसाय करणारे सूरतचे हिरे व्यापारी इथून आपला हिरे व्यवसाय बंद करून सूरतला स्थलांतरित होत आहेत.