मुंबई: यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला स्वपक्षीयांच्या नाराजीचा मोठा फटका बसण्याची चिन्हे आहेत. भाजपसोबतच्या युतीमुळे सेनेला अनेक जागांवर पाणी सोडावे लागले होते. त्यामुळे निवडणूक लढवण्याची संपूर्ण तयारी केलेल्या अनेक शिवसैनिकांचा हिरमोड झाला होता.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात युतीमुळे तिकीट कापल्या गेलेल्या शिवसैनिकांची जाहीर माफी मागितली होती. मात्र, यामुळे फारसा फरक पडल्याचे दिसत नाही. कारण, राज्यातील शिवसेनेच्या २६ नगरसेवक आणि ३०० कार्यकर्त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामे पाठवले आहेत. जागावाटप आणि उमेदवार निवडीविषयीची नाराजी जाहीर करण्यासाठी हे राजीनामे पाठवण्यात आल्याचे समजते. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेसमोर पेच उभा राहिला आहे. आता उद्धव ठाकरे या सगळ्यातून कशाप्रकारे मार्ग काढणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
'मातोश्री'च्या अंगणात बंडखोर तृप्ती सावंत यांचा धडाक्यात प्रचार
Maharashtra: 26 Shiv Sena corporators and around 300 workers of the party have sent their resignation to the party chief Uddhav Thackeray citing their 'unhappiness over the distribution of seats' for the upcoming #MaharashtraAssemblyPolls pic.twitter.com/yqlOtrpJ23
— ANI (@ANI) October 10, 2019
यंदा युतीच्या जागावाटपात अनेक अनपेक्षित निर्णय पाहायला मिळाले होते. शिवसेना आणि भाजपने स्वत:चे आमदार असूनही अनेक मतदारसंघ परस्परांसाठी सोडले होते. त्यामुळे अनेक शिवसेना नेत्यांचा हिरमोड झाला होता. त्यामुळे या नेत्यांनी बंडखोरीचे निशाण फडकवले होते. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत पक्षाकडून बंडखोरांची समजूत काढण्याचे प्रयत्न झाले. मात्र, तरीही काही बंडखोरांनी माघार घेण्यास नकार दिला होता. शिवसेना पक्षप्रमुखांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीच्या अंगणातही बंडखोरी झाली आहे. याठिकाणी तृप्ती सावंत यांनी शिवसेनेचे उमेदवार विश्वनाथ महाडेश्वर यांच्याविरोधात शड्डू ठोकला आहे. त्यामुळे वांद्रे पूर्व हा शिवसेनेचा बालेकिल्ला धोक्यात आला आहे.
'पुढच्या दसरा मेळाव्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री व्यासपीठावर असेल'