मुंबई : दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांच्यासोबत काम करणं हे एका Dream Job पेक्षा काही कमी नाही. त्यांच्यासोबत काम करण्याची इच्छा तर सगळ्याच तरूणांची असते पण खूप कमी लोकांचं हे स्वप्न सत्यात उतरतं. त्यातील एक म्हणजे 27 वर्षीय शंतनू नायडू.
शंतनू नायडू रतन टाटासोबत काम करत आहे. खास बात म्हणजे, रतन टाटा यांनीच शंतनूला फोन करून कामाची ऑफर दिली. शंतनूने सोशल मीडियावर रतन टाटा यांच्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला असून 'ह्यूमन्स ऑफ बॉम्बे' (Humans of Bombay)या फेसबुक पेजवर संपूर्ण स्टोरी शेअर केली आहे.
शंतनूची 2014 मध्ये पहिल्यांदा रतन टाटांसोबत भेट झाली होती. पाच वर्षांपूर्वी भटक्या कुत्र्यांच्या अपघाताबाबत मी विचार करायला सुरूवात केला. या कुत्र्यांसाठी काहीतरी करायला हवं असं त्याला वाटू लागलं. त्यानंतर मी माझ्या टीमसोबत कुत्र्यांना वाचविण्यासाठी एक कॉलर तयार केला. ज्यामध्ये वाहन चालकाला खूप लांबूनच कुत्रा दिसू शकेल जेणे अपघात टाळले जातील. आणि अगदी तसंच झालं, कॉलरमुळे कुत्र्यांचा जीव वाचत असल्याचा मॅसेज आला.
ही बातमी अगदी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली. शंतनूच्या वडिलांनी रतन टाटा देखील प्राणीप्रेमी असल्याचं सांगून त्यांना या प्रोजेक्ट संदर्भात पत्र लिहिण्यास सांगितलं. शंतनू सुरूवातीला गोंधळला पण नंतर त्याने रतन टाटांना पत्र लिहिलं.
दोन महिन्यांनंतर शंतनूचं संपूर्ण आयुष्यच बदललं. रतन टाटांची स्वाक्षरी असलेलं एक पत्र शंतनूला आलं. त्यापत्रात त्यांनी शंतनूला भेटीकरता बोलावल्याचं सांगितलं. त्यानंतर शंतनू आणि रतन टाटा यांच्या मुंबई कार्यालयात भेट झाली. शंतनूना त्यांना कामाबद्दल सगळ्या गोष्टी सांगितल्या. या भेटीनंतर रतन टाटा शंतनूला आपल्या घरी त्यांचे पाळीव कुत्रे पाहायला घेऊन गेले.
त्यानंतर पुढील शिक्षणाकरता शंतनू परदेशी गेला. पण त्याने रतन टाटांना शब्द दिला की, पुन्हा आल्यावर तो टाटा ट्रस्टसोबत काम करेल. आपली मास्टर्स पूर्ण करून मुंबईत आल्यावर रतन टाटांचा शंतनूला फोन आला. मला ऑफिसमध्ये भरपूर काम आहे. तू माझा असिस्टंट म्हणून काम पाहशील का? सुरूवातीला शंतनूला काय बोलावं कळलं नाही. पण पुढच्या सेकंदात त्याने 'हो' असं उत्तर दिलं.
गेल्या 18 महिन्यांपासून शंतनू नायडू रतन टाटांसोबत काम करत आहे. अजूनही त्याला या गोष्टीवर विश्वास बसत नाही की, त्याने रतन टाटांसोबत काम केलं आहे. सगळेजण रतन टाटांना 'Boss' असं संबोधतात पण शंतनू त्यांना 'Millennial Dumbledore' असं संबोधतो.