शिवसेनेतून मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे यांचं नाव आघाडीवर

शिवसेनेच्या अनेक आमदारांची सहमती

Updated: Nov 22, 2019, 12:06 PM IST
शिवसेनेतून मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे यांचं नाव आघाडीवर

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर सर्व आमदारांची महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीत शिवसेनेची सत्तास्थापनेची अधिकृत भूमिका स्पष्ट होणार होती. सोबतच मुख्यमंत्रीपदाचं नाव देखील निश्चित होण्याची शक्यता होती. बैठकीत उद्धव ठाकरे यांनीच मुख्य़मंत्री व्हावं असं आमदारांचं म्हणणं होतं. पण उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाला नकार दिल्याचं कळतं आहे. 'आपण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वचन दिलं होतं की, मुख्यमंत्रीपदी शिवसैनिकाला बसवेल. ही खूर्ची आपल्यासाठी नाही मागितली.' असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे यांचं नावावर अनेक आमदारांनी सहमती दर्शवली. 

जनतेतून निवडून आलेला नेता मुख्यमंत्री व्हावा असं एकमताने आमदारांनी म्हटलं. ठाण्यातील आमदार एकनाथ शिंदे यांच्या नावावर अनेक आमदारांनी सहमती दर्शवली आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे शिवसेनेतून मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे. पण सर्व अधिकार हे उद्धव ठाकरे यांनाच असल्याचं आमदारांनी म्हटलं आहे.

संजय राऊत यांचं नाव देखील मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेत आहे. पण संजय राऊत यांच्या नावावर उद्धव ठाकरे सहमत नसल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे मातोश्रीशी एकनिष्ठ असलेले एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदी विराजमान होण्याची शक्यता अधिक आहे.

राज्यात पाच वर्षे शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार असा पुनरुच्चार शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीच मुख्यमंत्री व्हावं, राज्याचं नेतृत्व करावं अशी जनतेची, सर्व शिवसैनिकांची इच्छा असून त्याला तिन्ही पक्षांची सहमती असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिल्लीत पत्रकार परिषदेत दिली.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचा उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हावं असा आग्रह आहे. पण आता उद्धव ठाकरे हे जर मुख्यमंत्री होणार नसतील तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे ही लक्ष लागलं आहे.